घराणेशाहीमुळे पवारांच्या घरातली सत्ता गेली : बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे
बीड : वारसा आणि घराणेशाहीमुळे पवारांच्या घरातली सत्ता गेली, असं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केलंय. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोक कुठेतरी घराणेशाहीच्या विरोधात जातात, कुठवर लोक तेच तेच स्वीकारतील? असं ते म्हणाले. यावर पवारांच्याही घरात वारसा आहे, असा प्रश्न विचारला असता, त्यांच्याही विरोधात […]
बीड : वारसा आणि घराणेशाहीमुळे पवारांच्या घरातली सत्ता गेली, असं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केलंय. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोक कुठेतरी घराणेशाहीच्या विरोधात जातात, कुठवर लोक तेच तेच स्वीकारतील? असं ते म्हणाले. यावर पवारांच्याही घरात वारसा आहे, असा प्रश्न विचारला असता, त्यांच्याही विरोधात लोक गेले.. सत्ता दिली ना दुसऱ्यांना.. पंधरा वर्षे सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती.. ती सत्ता गेली, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निवडणुकीत घराणेशाहीमुळे टीका झाली होती. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात पवारांचे दुसरे नातू रोहित पवारही विधानसभेची तयारी करत आहेत. ही सर्व टीका होत असतानाच स्वतःच्या उमेदवारानेच घरचा आहेर दिला आहे.
कोण आहेत बजरंग सोनवणे?
बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून, तर यांच्या पत्नी सारीका सोनवणे या युसुफवडगाव गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. या पूर्वी बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषविले असून त्या काळात त्यांनी शिक्षण आणि शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देणे आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न याची राज्यस्तरावर चर्चा झाली होती.
बजरंग सोनवणे यांचे सहकार क्षेत्रातही चांगले कार्य असून खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात आहेत. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते चालवित असलेला येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बजरंग सोनवणे हे जॉईंट किलर म्हणून ओळखले जात असून विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.