मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा नियोजित उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात होती. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. (Sharad Pawar North Maharashtra tour cancelled)
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती.
विशेष म्हणजे खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून हा पहिलाच जाहीर दौरा आयोजित केला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसह खडसे समर्थकांकडून जोरदार शक्तप्रदर्शन केले जाण्याची शक्यता होती. शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही करण्यात आले होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
शरद पवारांचा हा दौरा येत्या काळात पुन्हा आयोजित केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र याची तारीख किंवा ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई पार पडलेल्या समारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Sharad Pawar North Maharashtra tour cancelled)
संबंधित बातम्या :
खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्रात, तारीख आणि स्थळ ठरलं!