BMC Election 2022 : शरद पवार संकटात संधी शोधतायत? मुंबई महापालिकेसाठी कामाला लागण्याचे पवारांचे आदेश, इतिहास काय सांगतो?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) संकटात संधी शोधत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कामाला लागण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना दुभंगली आहे. शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व प्रयत्न केले. मात्र, अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फुटले. इतकंच नाही तर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांत होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) तोंडावर हे डॅमेज कंट्रोल शिवसेनेला किती तारणार हे कुणीही सांगू शकत नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) संकटात संधी शोधत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कामाला लागण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक मंगळवार आणि बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यापुढे संघटना वाढवून ती बळकट करण्याचे आणि शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असं आवाहन पवार यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केलं.
कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी माझी सूचना आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे.@JadhavRakhee pic.twitter.com/fkKwc9m9gI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 13, 2022
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीला आपला झेंडा फडकाविण्याची संधी
इतकंच नाही तर मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच, तसंच मी देखील वेळ देईन, मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वार्डात न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे, असं सांगत पवारांनी एकप्रकारे आपले इरादेच स्पष्ट केले आहेत. तसंच कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी माझी सूचना आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे, असं सांगत पवारांनी आपला मनसुबाच जाहीर केलाय.
राष्ट्रवादीचा मुंबई महापालिकेतील इतिहास काय?
असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून झालेल्या चार मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये 227 पैकी राष्ट्रवादीला कधीच 13 ते 14 जागांच्या पुढे यश मिळालेलं नाही. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत तर त्यातील 4 जागा कमी झाल्या होत्या. मात्र, आता पवारांनी आपला इरादा स्पष्ट केल्यानं यंदा मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस गांभीर्यानं घेणार असल्याचं दिसून येत आहे.
पवार संकटात संधी शोधतायत?
शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना मुंबई आणि ठाण्यात दुर्बल बनली आहे. नेमकी हीच जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस भरुन काढण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाकरेंची शिवसेना आकड्यांमध्ये कमी पडू शकते. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तर मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते, असा अंदाज आता बांधला जातोय. त्यामुळे आता ठाकरे मुंबई महापालिकेसाठी कोणती रणनिती आखतात? पवार मुंबईत किती जोर लावतात? भाजप आणि शिंदे गटाकडून काय खेळी खेळली जाते? तसंच राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात? यावरच मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याचं उत्तर अवलंबून असणार आहे.
पवार संकटात संधी शोधतायत- – पुरेपुर अंदाज आहे की शिवसेना मुंबई-ठाण्यात आता दुर्बल आहे. तो स्पेस त्यांना घेता येईल – शिंदेंमुळे ठाकरे आकड्यात शॉर्ट पडू शकतात. – cong-ncp ने पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या तर BMC त MVA अस्तित्वात येईल
पवार उगीचच NCP ला संधी आहे म्हणत नाहीयत. https://t.co/67zxG2GMCf
— Manik Balaji Mundhe (@Manikmundhe) July 13, 2022