मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघातामध्ये (Accident) निधन झालं. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी देखील विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटे यांच्या मृत्यूची बातमी दुर्दैवी असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. विनायक मेटे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. मेटे यांचं मराठा समाजासाठी मोठं योगदान आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका उमद्या नेत्याला मुकला असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे.
विनाक मेटे यांचा आज पहाटे साडेपाच वाजता पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर खोपोली परिसरातील बातम बोगद्याजवळ अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालावली. आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. या बैठकीसाठी ते मुंबईकडे येत होते. मुंबईकडे येत असताना त्यांचा अपघात झाला. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंगराच्या कपारीला धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या बीडमधील शिवसंग्राम कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.