….तर विधानसभेला लोकसभेसारखा निकाल लागणार नाही, शरद पवार यांचं मोठं विधान; महाविकास आघाडीला टेन्शन?
"संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकजुटीने मतदान केलं पाहिजे, असा विचार लोकांनी केला. त्यामुळे ४०० वरून चित्र खाली आलं", असे शरद पवारांनी म्हटले.
Sharad Pawar On Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीबद्दल मोठे विधान केले आहे. शरद पवारांच्या या विधानामुळे महाविकासाआघाडीतील घटक पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
“आता त्या सत्तेत वाटेकरी”
“चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची साथ घेतली. त्यामुळे या सरकारला स्थैर्य आलं आहे. हे दोन्ही पार्टनर मोदी सोबत आहेत. तोपर्यंत मोदींना अडचण नाही. पण १० वर्ष पाहिलं सर्व सत्ता मोदींच्या हातात होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आले आहेत. वाटेकरी आल्याने त्याचा परिणाम दिसतो का हे आम्ही पाहत आहोत. एका मुठीत ही सत्ता होती आता ती अवस्था राहिली नाही”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
“त्यामुळे ४०० वरून चित्र खाली आलं”
“लोकसभेत दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे भाजपच्या काही लोकांनी ४०० जागा पाहिजे सांगितलं. का तर संविधानात बदल करायचा आहे. हेगडे नावाच्या भाजपच्या मंत्र्याने संविधान बदलायचं आहे असं सांगितलं होतं. त्यांनीच नव्हे तर मोदींनीही अशीच भूमिका मांडली होती. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे. त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकजुटीने मतदान केलं पाहिजे, असा विचार लोकांनी केला. त्यामुळे ४०० वरून चित्र खाली आलं”, असे शरद पवारांनी म्हटले.
“…तर लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही”
“आता विधानसभेच्या निवडणुका आहे. त्या तीन एक राज्याच्या निवडणुका आहेत. लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. पण आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे, असं लोकांना वाटतं. लोकसभेला आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आलं पाहिजे. मूर्त स्वरुप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आलं तर आजचे राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल. पण लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असं वाटतं”, असे थेट विधान शरद पवारांनी केले.