शरद पवार म्हणाले, तीन मुद्दे मांडणार, पण चौथ्या महत्त्वाच्या विषयावर थेट मत मांडलं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar press conference) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar press conference) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या (Sharad Pawar press conference) भेटीला त्यांच्या निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’वर गेले होते. महाराष्ट्राची दिशा ठरवणाऱ्या पवारांच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. शरद पवारांनी आपल्याला तीन मुद्दे मांडायचे आहेत, असं सुरुवातीलाच सांगितलं. त्यांनी तीन मुद्द्यांवर थोडक्यात आणि चौथ्या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर भूमिका मांडली.
दिल्ली पोलिसांवरील हल्ल्यावर भाष्य
दिल्लीत पोलीसांना चुकीची वागणूक मिळाली. गणवेशातल्या लोकांवर हल्ले होतात त्याचा नैतिक परिणाम होतो. वर्दीमध्ये असलेल्यांवर जेव्हा हल्ला होतो, ते गंभीर आहे. देशातील सर्वच पोलिसांची स्थिती गंभार आहे, त्यांना 14-18 तास काम करावं लागतं, सुट्टी मिळत नाही, अशा परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेणाऱ्यावर असा हल्ला होणे गंभीर आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली की नाही याची माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील अतीवृष्टी
शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नवीन पीकांसाठी कर्जपुरवठा करावा. विमा कंपन्या आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, सरकारने तातडीने विमा कंपनीची बैठक बोलवून त्यांना सूचना द्यावी.
मी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे. ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेल. विमा कंपन्या त्यांची पूर्णपणे पार पाडायला तयार नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं या विमा कंपन्यांची बैठक घ्यावी त्यांना सूचना द्याव्या, असं शरद पवार म्हणाले.
अयोध्या निकाल अयोध्येचा निकाल लागल्यानंतर समाजातील कुठल्याही घटकाने तो आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेऊ नये, निर्णय आल्यानंतर कुणाही कायदा हाती घेऊ नये, बाबरी सारखी स्थिती कुठल्याही परिस्थितीत देशात निर्माण होऊ नये, असं आवाहन शरद पवारांनी केले.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी
राज्याच्या परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, आम्ही वाट पाहातोय, भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे, त्यांनी लवकर सरकार स्थापन करावं, राष्ट्रवादी-काँग्रेसने जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका घ्यावी, असं शरद पवार म्हणाले.
सरकार त्यांनी लवकरात लवरकर बनवावं. त्यांना सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. भाजप सेनेची 25 वर्षाची युती आहे ते तोडतील असं वाटत नाही. संजय राऊत यांनी कुठलाही प्रस्ताव घेऊन आले नाही. आम्हाला विरोधात बसायची संधी दिलीय, आम्ही ती नीट निभावू, असं शरद पवार म्हणाले.