आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स!
मराठी भाषिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार करण्याचे प्रयत्न आहेत. तुम्ही धीर द्यावा, असा संदेश असल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं.
पुणेः बेळगावातील (Belgaum) मराठी भाषिकांवर (Marathi) सातत्याने अन्याय होत असून गेल्या आठवड्यापासून ही स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आम्ही सध्या प्रचंड दहशतीत आहोत. येथील जिल्हाधिकारीदेखील आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीयेत, तुम्ही कृपया आम्हाला धीर द्या, अशी विनंती बेळगावमधील मराठी भाषिकांनी केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार यांनीही आंदोलनं केली आहेत. अनेकदा त्यांना सत्याग्रह, लाठीहल्ल्याला तोंड द्यावं लागलं. अनेक अनुभव आहे. ज्या वेळेला सीमाभागात घडतं, त्यावेळेला अनेक घटक माझ्याशी संपर्क साधतात, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
गेल्या आठवडाभरापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सातत्याने होणारी प्रक्षोभक वक्तव्ये यामुळे मराठी भाषिक चिंतेत आहेत, ते वारंवार मला फोन करत आहेत. आम्हाला धीर द्या, अशी विनंती करत असल्याची माहिती पवार यांनी दिली.
पुण्यात बोलताना ते म्हणाले, ‘ एकिकरण समितीचे पदाधिकारी यांचा मॅसेज आहे. बेळगावची स्थिती गंभीर आहे. एकिकरण समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी होते.. समितीच्या कार्यालयासमोर पोलीसांचा पहारा असतो. महाराष्ट्रातून येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी करण्यात येतेय. तर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी होतेय. अशा पद्धतीचे दहशतीचे वातावरण आहे.
कलेक्टरला निवेदन देण्यासाठी गेल्यास तेदेखील आमचं निवेदन स्वीकारत नाहीत. 19 डिसेंबरला अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार करण्याचे प्रयत्न आहेत. तुम्ही धीर द्यावा, असा संदेश असल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे गेल्या काही दिवसांपासून चिथावणीखोर वक्तव्य करत असून याचे परिणाम गंभीर स्वरुपात होतील, असा इशारा शरद पवार यांनी दिलाय.