हवा काय फक्त सिंधुदुर्गात येते का?; शरद पवार यांनी राज्य सरकारला फटकारले
महाराष्ट्रात सर्व समाजाला शांतता हवी आहे. नाशिकमध्ये कोणीतरी महाराज आहे, शांतिगिरी नावाचा. काहीतरी तो बोलला. त्यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं हे कोणालाही आवडणार नाही. समाजात अशा प्रकारचं वक्तव्य करणारे कुठलेही धर्माचे लोक असतील हे कोणीही खपवून घेणार नाही. याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणावर या निमित्ताने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडल्याचं कारण राज्य सरकारने दिल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. हवा काय फक्त सिंधुदुर्गातच येते का? असा संतप्त सवाल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शरद पवार यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी साहेबांच्या अचानक मनात आलं आणि त्यांनी नवीन पार्लमेंट तयार केली. त्यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना पार्लमेंटच्या उद्घाटनासाठी बोलावलं नाही. ज्यांचा पार्लमेंटची काहीही संबंध नाही, त्यांच्या हातातून पार्लमेंटचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांनी संसदेचा उद्घाटन केलं, मात्र त्या ठिकाणी काही ना काही कमतरता आढळली.अयोध्येत राम मंदिर बनवलं. मंदिरात पाणी यायला सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला. शिवाजी महाराज सर्वांना सोबत घेऊन जाणारे राजे होते. शिवाजी महाराजांनी अल्पसंख्यांकाला देखील आपला हिस्सा दिला होता. त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये नुकतीचे घटना घडली. पंतप्रधान मोदी देखील त्या कार्यक्रमाला आले होते. आठ महिन्यांपूर्वी पुतळ्याचे उद्घाटन झालं आणि आता तो पुतळा कोसळला. आठ महिन्यात घडलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
तसं काही घडलं नाही
ज्यांच्या हातात सत्ता आहे. मुख्यमंत्री असो किंवा त्यांचे सहकारी असोत त्यांचं म्हणणं आहे की, त्या ठिकाणी इतकी जोरात हवा होती की तो पुतळा कोसळला. आता गेटवे ऑफ इंडियाच्या इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त जुना हा पुतळा आहे. मात्र हा पुतळा जसाच्या तसा आहे. मला हे कळत नाही की हवा फक्त काय फक्त सिंधुदुर्गमध्ये येते का? गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असं काही कधी झालं नाही, असा जाबच शरद पवार यांनी विचारला.
आपल्याला सत्ता आणायचीय
विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. शिवसेना आणि काँग्रेससोबत मिळून निवडणूक लढवायची हे आम्ही ठरवलं आहे. आमच्या आघाडीला लोकसभेला 31 जागा मिळाल्या होत्या. आता आपल्याला राज्यात सत्ताच आणायची आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. सगळ्यानी काम करण्याचा अधिकार आहे. अल्पसंख्याक समाजाला काम द्यायची वेळ येते त्यावेळीं अडचणी आणल्या जात आहेत, असं शरद पवार म्हणाले.
उणीव भरून काढू
आता जागावाटपंची आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस किती जागा लढणार याची चर्चा सुरू आहे. यामध्ये अल्पसंख्यांक बांधवांना किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीत कमी जागा देण्यात आला. यावेळी ही उणीव भरून काढू, असंही त्यांनी सांगितलं.
ते त्यांचं ध्येय होतं
देशात ज्यांची सत्ता आहे त्यांनी वफ बोर्ड संदर्भामध्ये नवीन कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभेमध्ये आम्ही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं मांडलं आहे. आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो आहोत. वक्फ बोर्ड कायदा पास करणे हे त्यांचे ध्येय होतं. म्हणून सुप्रिया सुळे यांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्या संदर्भात मागणी केली. सगळ्या पक्षांच्या सदस्यांना घेऊन ही समिती स्थापन व्हावी अशी मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये ही भूमिका मांडली आणि त्याला अनेक खासदारांनी पाठिंबा देखील दिला, असंही त्यांनी सांगितलं.
फौजिया खान यांना संधी द्यायला हवी होती
जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये आमचे देखील सदस्य आहेत. फौजिया खान यांचं देखील नाव दिलं होतं. मात्र सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्यांचं नाव त्या कमिटीमधून काढलं. फौजिया खान यांना संधी देणे गरजेचे होतं, मात्र तसं होऊ दिलं नाही. भिवंडीमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाज आहे, त्या ठिकाणाहून आमचा जो खासदार निवडून आला आहे, त्या बाळ्या मामा यांना आम्ही संसदेत या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पाठवलं आहे. मुस्लिमांचे प्रॉब्लेम्स ते मांडू शकतील यासाठी त्यांना पाठवलं आहे. वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणायचा त्यांचा प्रयत्न आहे. याबाबत आमचा खासदार नक्की कमिटीमध्ये बोलेल. कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा यांचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.