Sharad Pawar : ‘राजकारणात ज्याला समजतं त्यालाच महत्व द्यावं’, पवारांचा केसरकरांना जोरदार टोला; खातेवाटपावरुन शिंदे-फडणवीसांवर निशाणा
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावलाय. राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं. त्यांचं वक्तव्य दखल घेण्यासारखं नाही. कोण बोलतं हे ही महत्वाचं आहे, अशा शब्दात पवारांनी केसरकरांना प्रत्युतर दिलं.
नागपूर : राज्यातील सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात धडक दिलीय. विदर्भात राष्ट्रवादीला मजबूत करण्याची मोहीम पवारांनी हाती घेतलीय. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. तसंच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावलाय. राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं. त्यांचं वक्तव्य दखल घेण्यासारखं नाही. कोण बोलतं हे ही महत्वाचं आहे, अशा शब्दात पवारांनी केसरकरांना प्रत्युतर दिलं.
राज्यात नवं सरकार येऊन दोन आठवडे उलटून गेले तरी अद्याप खातेवाटप नाही. या मुद्द्यावरुन पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. गेली 10 – 12 दिवस दोनच मंत्री काम करत आहेत. राज्यात पूरस्थिती आहे, पण प्रशासन ठप्प आहे. दोघंच जण आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता हे नुकसानदायक आहे, असं पवार म्हणाले. या सरकारनं काही नवीन केलं असतं तर मी त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि काहीतरी मोठं केलं हे दाखवणं चुकीचं असल्याचं पवार म्हणाले.
‘कुणाची काय कुवत हे राऊतांना माहिती’
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे हे खरे मुख्यमंत्री नाहीत, खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, अशी टीका केलीय. त्याबाबत पवारांना विचारलं असता संजय राऊतांनी या दोघांबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुणाची काय कुवत आहे हे चांगलं माहिती असल्याचा उपरोधिक टोला पवारांनी लगावलाय.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रित लढवल्या तर लोकांना जो हवा आहे तशाप्रकारचा निर्णय घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे आधी आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली नाही. माझंही मत तेच आहे. माझं मत ते असलं तरी आधी काँग्रेससोबत चर्चा करावी लागेल. त्यांच्यासोबत अद्याप चर्चा केली जाईल. आम्हाला शिवसेनेसोबत बोलावं लागेल. त्यांचं मत ते असलं तर चर्चा केली जाईल. या प्रश्नावर आम्ही तिघेई एकत्र बसून आणि यात शक्य झालं तर एकत्र निर्णय घेऊ, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलीय.