Sharad Pawar : कुणी हनुमान पुढे आणतो, त्यातून प्रश्न सुटणार आहेत का? शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मूलभुत प्रश्न, महागाईचा मुद्दा बाजूला ठेवून आज वेगळ्याच मागण्या केल्या जात आहेत. कुणी हनुमान पुढे आणतोय, पण त्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? असा खोचक सवाल शरद पवारांनी केलाय.

Sharad Pawar : कुणी हनुमान पुढे आणतो, त्यातून प्रश्न सुटणार आहेत का? शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक सवाल
शरद पवार, राज ठाकरे
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 3:58 PM

मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मूलभुत प्रश्न, महागाईचा मुद्दा बाजूला ठेवून आज वेगळ्याच मागण्या केल्या जात आहेत. कुणी हनुमान पुढे आणतोय, पण त्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? असा खोचक सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar) केलाय. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

राज ठाकरेंवर पलटवार

सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे, हे करणार ते करणार, हनुमानाच्या नावाने करणार, आणखी कुणाच्या नावाने करणार, या सगळ्या चर्चा, मागण्या याने बेकारीचा प्रश्न, भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतःचा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

‘..म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतो’

शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टिका केल्याचा उल्लेख करताना मग नावं कुणाची घ्यायची? असा सवाल करत शाहू – फुले आंबेडकरांचे नाव का घेतो याबाबतची माहिती शरद पवार यांनी दिली. आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं मात्र हिंदूस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा… अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे असेही शरद पवार म्हणाले.

विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने 28 मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यासमवेत सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड उपस्थित राहून बैठक घेऊ असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी शरद पवार यांनी या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना मजबूत हवी आणि या मजबूत संघटनेला हिरालाल राठोडसारखा नेता हवा अशा शब्दात स्तुती केली.