Sharad Pawar : ‘बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आज किंवा उद्या कठोर कारवाई होईल, मुख्यमंत्री निर्णय घेतील’, शरद पवारांचे संकेत
बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला. त्यावेळी बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आज किंवा उद्या कठोर कारवाई होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. त्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे 16 पिटिशनही दाखल करण्यात आलेत. त्यानंतर झिरवळ यांनी या 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तशी कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे या बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला. त्यावेळी बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आज किंवा उद्या कठोर कारवाई होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.
बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार?
सरकार बनलं तेव्हा लोक अडीच महिने चालेल सहा महिने चालेल असं सांगितलं जात होतं. पण आम्ही अडीच वर्ष पूर्ण केली. अजुनही सरकार चालंल पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पार पाडत आहोत. पाहू आमदार आल्यावर अंदाज येईल, असं पवार म्हणाले. त्यावेळी पत्रकारांनी बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला. तेव्हा मंत्र्यांचा राजीनामा मी घ्यायचा का. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. ते घेतील. आज उद्या कधी तरी घेतील, असे सूचक संकेत त्यांनी दिलेत.
‘गुवाहाटीला काय जादू आहे हे मला माहीत नाही’
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा बंडखोरांनी विधान केलं होतं की आम्ही राष्ट्रवादीमुळे नाराज आहोत. त्यामुळे राऊतांनी विधान केलं. महाआघाडीतून बाहेर पडतो परत या, असं राऊत बोलले असतील. गुवाहाटीला जाऊन मला बरीच वर्ष झाली आहेत. तिकडे काय चांगलं आहे काय जादू आहे हे मला माहीत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात काही कारण नसताना आमदार जातात. याचा अर्थ त्यांना काही आश्ववासने दिल्याची काही गोष्टींची पूर्तता केल्याचं दिसतंय. हे लोक परत येतील असं वाटतं. ते आम्हाला मिळतील असं शिवसेनेला वाटतं. शिवसेनेची ही अंतर्गत बाब आहे. त्यांना ती अधिक माहीत आहे, असं पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
शरद पवारांचा भाजपवर आरोप
आमदार घेऊन जाण्यासाठी जी राज्ये निवडली गुजरात आणि आसाम. तिथे सत्ता कुणाची आहे तर भाजपची. भाजप यात कुठपर्यंत आहे हे मला माहीत नाही. पण ग्राऊंडलेव्हला स्पोर्ट मिळतोय ते पाहून त्यांचा संबंध असू शकतो. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. असं शिंदे म्हणाले. माझ्याकडे राष्ट्रीय पार्टीची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी सीपीएम, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठिंबा नाही. मग राष्ट्रीय पक्ष कोणता उरला? असा सवाल करत पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधलाय.