राऊतांचे दोन ‘ब्रँड’ एकत्र, संजय राऊतांसह शरद पवार-राज ठाकरे एकाच मंचावर येणार
शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि राज ठाकरे यांना अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन पक्षांचे तीन शिलेदार एकाच मंचावर दिसणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दिग्गज राजकीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची चिन्हं आहेत. ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्रातील दोन ब्रँड असल्याचा उल्लेख करत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. (Sharad Pawar Sanjay Raut Raj Thackeray likely to share dais)
‘चौकात उधळले मोती’ या अंबरिश मिश्र लिखित पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि राज ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
याआधी, राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेतलेली आहे. पुण्यात 2017 मध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली ‘महामुलाखत’ चांगलीच गाजली होती. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या प्रश्नांच्या चेंडूंवर पवारांनी तूफान फटकेबाजी केली होती.
हेही वाचा : ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका
दुसरीकडे, संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’साठी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. “माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले, तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले, की आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरुन पाठिंबा देतो. हेतू हा होता की शिवसेना त्यांच्यापासून दूर व्हावी” असा दावा शरद पवार यांनी त्यावेळी केला होता.
राज ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांनी जाहीर मंचावर एकत्र येण्याची नजीकच्या काळातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. उत्तम वक्ते असलेले तिघेही जण कोणती टोलेबाजी करणार, यावेळी तिघांमध्ये कोणत्या गप्पा रंगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Raj Thackeray likely to share dais)
पत्रकार, लेखक अंबरीश मिश्र यांनी आज भेट घेतली. ‘चौकात उधळले मोती’ हे त्यांचे नुकतेच प्रकाशित होत असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले. धन्यवाद. pic.twitter.com/GhcMGbD2xO
— Supriya Sule (@supriya_sule) October 21, 2020
(Sharad Pawar Sanjay Raut Raj Thackeray likely to share dais)