Breaking News : पंतप्रधानच धर्माचा आधार घेऊन घोषणा… ‘जय बजरंग बली’च्या घोषणेवरून शरद पवार यांनी सुनावले
जनरली विकासाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नसतो. पण विकास प्रकल्पाच्या नावाने बळाचा वापर करणं, लोकांना मान्य नसलेले प्रकल्प लादणं, पर्यावरणाशी तडजोड करणं योग्य नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जय बजरंग बलीच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच पंतप्रधानांना सुनावले आहे. आपण धर्मनिरपेक्ष ही संकल्पना स्वीकरली आहे. निवडणुकीला उभं राहताना आपण ही शपथ घेतो. त्यात लोकशाही आणि धर्मनिरेपक्षतेचा उल्लेख आहे. असं असताना निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभं करणं आणि त्यातून वेगळं वातवरण तयार करणं हे देशाच्या दृष्टीने चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात याचं आश्चर्य वाटतं. देशासाठी ही गोष्ट चांगली नाही, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तो मागे घेतला. या नाट्यामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर, महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद नाही. मतभेद व्हावेत असं कोणी काही केलं नाही. एकत्र राह्यचं हे आम्ही ठरवलं. एकत्र राहायचं तर कशासाठी? त्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रॅम लागतो. निगेटिव्ह प्रभाव घेऊन चालत नाही. जेव्हा आमची चर्चा पूर्ण होईल. तेव्हा कुणाचंही मत वेगळं दिसणार नाही. एका विचाराने पर्याय द्यायचं हे सर्वांचं मत स्वच्छ आहे. पर्याय द्यायचा, तो कोणत्या दिशेने न्यायचा? लोकांना काय सांगणार आहोत? याची आम्ही लवकरच चर्चा करू. महाविकास आघाडीची जी काही चुकीची चर्चा केली जाते. ती संपली आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
त्यात चूक काही नाही
आमच्याकडे बी प्लॅन आहे, असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं होतं. तसेच ज्यांची संख्या अधिक त्यांचा मुख्यमंत्री असंही पटोले म्हणाले होते. त्याकडेही पवार यांचं लक्ष वेधलं. आजही कुणाचं तरी स्टेटमेंट वाचलं. साधारण ज्यांचे जास्त आमदार असतील त्याचा नेता, अशी विधाने केली जातात. यात काही फारसं चुकीचं नाही. या मुद्द्यावर आम्ही चर्चा केली नाही. हे कुणाचं तरी व्यक्तीगत मत असेल. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना व्यक्तीगत मत मांडायला काही अडचण नाही, असं पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्यच
बारसूचं आंदोलन पेटलं, तुम्ही जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बारसूबाबत केंद्राला पत्र पाठवलं तेव्हा काय परिस्थती होती ते मला माहिती नाही. आज त्यांच्यासमोर बारसू परिसरातील लोकांच्या, सर्व सामान्य जनतेच्या तीव्र भावना लक्षात आल्या. हा एक भाग. दुसरं पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होईल ही भूमिका मांडली गेली.
तसेच तिथे काही प्रमाणावर शिल्प दिसत आहेत. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ही माहिती त्यांच्यासमोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही भूमिका मांडली असेल तर त्यात चूक नाही. कोणताही निर्णय घ्या, पण स्थानिक लोकांना विश्वास घेऊन, त्यांना दुर्लक्षित न करता निर्णय घ्या. बळाचा वापर करू नका, असं उद्धव ठाकरे सांगतात. त्यांचं मत योग्यच आहे. आमचं मतही त्यांच्या सारखच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रकल्प लादू नका
बारसूतील स्थानिकांसोबत माझी बैठक झाली. त्यानंतर एक्सपर्ट सोबत एक बैठक करायची आहे. स्थानिक लोकांना विश्वास घेऊन, राज्य सरकारच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन या विषयात पुढे जावं असं मला वाटतं. स्थानिक लोकांशी माझं बोलणं झालं. उद्योगमंत्री सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे तीन अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मतं सांगितली.
मी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर माहिती घेतली जात आहे. आम्ही पुन्हा बसणार आहोत. पण जनरली विकासाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नसतो. पण विकास प्रकल्पाच्या नावाने बळाचा वापर करणं, लोकांना मान्य नसलेले प्रकल्प लादणं, पर्यावरणाबाबत तडजोड करावी लागेल असे प्रकल्प लादणं योग्य नाही. त्यातून मार्ग काढावा लागेल. त्यातून पुढे जावं लागेल. मला जसा वेळ असेल ते पाहून बारसूला जायचा निर्णय घेईल. माझी बारसूला जायची इच्छा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.