उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यांनतर उस्मानाबाद राष्ट्रवादीने (Osmanabad NCP) त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. पाटील पिता-पुत्रांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं किरकोळ नुकसान झाल्याचं सांगत, येत्या काही दिवसात पक्ष प्रमुख शरद पवार उस्मानाबादेत कार्यकर्ता मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या (Osmanabad NCP) नेत्यांनी दिली. पाटील परिवाराने केलेल्या गद्दारीच्या विरोधात त्यांच्या घरावर गाढव मोर्चा काढत रस्त्यावर अडविणार असल्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर संघाचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह अन्य पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. डॉ. पाटील परिवाराची राष्ट्रवादीतील घराणेशाही संपुष्टात आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेत पत्रकार परिषदेत हजेरी लावली, तर नेते मंडळी पहिल्यांदाच तणावमुक्त दिसली.
शरद पवार स्वतः उस्मानाबादेत येणार
पद्मसिंह पाटील म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष नाही. पाटील परिवार वगळता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या सोबत आहेत. पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश अदखलपात्र असून अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेले नाहीत. त्यामुळे पक्षाचं किरकोळ नुकसान झालंय. त्याची डागडुजी लवकरच केली जाणार असून शरद पवार लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यातील मेळावा घेत कार्यकर्त्यांना बळ देतील, असं जीवनराव गोरे यांनी सांगितलं. लवकरच उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून कार्यकर्त्यांना नवीन सेनापती मिळेल, असं गोरे म्हणाले.
“पाटील परिवाराने हुकूमशाही चालवली”
पद्मसिंह आणि राणा पाटील यांनी राष्ट्रवादीत हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवली. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी मिळाली नाही, असं सांगत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पाटील परिवारावर हल्लाबोल केला. पवार यांनी पाटील परिवाराला मंत्रिपदं दिली, मग त्या काळात विकास का करता आला नाही? त्यावेळी त्यांना विकासासाठी कोणी अडवलं होतं? असा सवाल विक्रम काळे यांनी पिता-पुत्रांना विचारला. स्वार्थासाठी पक्ष बदलण्याचा प्रकार असून उस्मानाबाद हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम राहिल, असं काळे म्हणाले.
“सत्ता असताना विकास का नाही केला?”
40 वर्ष सत्ता भोगून भाजपात गेलेल्या पाटील पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला. पाटील परिवाराच्या घरावर गाढव मोर्चा काढत त्यांना प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर अडविणार असल्याचा संकल्प राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय कांबळे यांनी केला. त्यांना जनतेच्या दरबारात उत्तर द्यावे लागेल, असंही ते म्हणाले.
शरद पवार हे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतः आखाड्यात उतरणार असल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे. शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्यात येणार असल्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कामाला लागला असून पाटील परिवाराची धाकधूक नक्कीच वाढणार आहे.