शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, पूरग्रस्तांच्या मदतीची आयडिया देणार
या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेला मुंबईत शरद पवार मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेणार आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत ही भेट होणार आहे. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात येणार आहे. पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं, त्यात कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती या निवेदनात असेल.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिकसह गडचिरोली या भागात महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुरामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मदतीची गरज आहे. दोन्ही जिल्हे आठवडाभर पाण्यात होते.
अनेक घरांची पडझड झाली आहे. गुरं-ढोरं वाहून गेली आहेत. लाखो नागरिकांचं विस्थापन केलं आहे. सध्या दोन्ही जिल्ह्यातील पाणीपातळी उतरुन, पूर ओसरला आहे. मात्र आरोग्याचा प्रश्न आहे. शिवाय लोकांना राहायला घरं नाहीत, प्रापंचिक साहित्य वाहून गेलं आहे. शेती आणि पीकं पूर्णत: नष्ट झाली आहे, त्यामुळे या भीषण संकटातून कसं सावरायचा असा प्रश्न कोल्हापूर-सांगलीच्या नागरिकांना आहे.