‘राठोडांचा राजीनामा, वाझे निलंबित; पण अनिल देशमुखांना वाचवलं; उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवतायत’
राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. | Chandrakant Patil Shivsena
सांगली: शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेवर दबाव आणून हे निर्णय घ्यायला भाग पाडले. उद्धवजी, शरद पवार (Sharad Pawar) हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. (BJP leader Chandrakant Patil slams Mahavika Aghadi govt)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यभरात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. वाझेंना निलंबित केले जाते तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि चौकशीही करावी’
शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या 52 ते 56 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले आहेत. मग ते अनिल देशमुख यांना पाठिशी का घालत आहेत? मात्र, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, तसेच त्यांची चौकशीही झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही याचा साक्षात्कार गृहमंत्र्यांना इतक्या दिवसानंतर झाला का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर मी कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो होतो, हे त्यांनी मान्य करावे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘राष्ट्रपती राजवटीची मागणी केली तर ती पूर्ण करुनच राहू’
यावेळी प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना भाजप राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करु तेव्हा ती पूर्ण करुनच राहू, असे वक्तव्य केले.
संबंधित बातम्या:
आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट
Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!
सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत
(BJP leader Chandrakant Patil slams Mahavika Aghadi govt)