शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मविआचे नेते अन् कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामोर्चाला सुरुवात
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात...
मुंबई : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ‘महामोर्चा’ (Mahamorcha) काढला आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. हळूहळू हा मोर्चा आता सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या दिशेने पुढे सरकत आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात अग्रस्थानी आहे.
मविआचे नेते ‘महामोर्चा’त
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, सपाचे अबू असीम आजमी, शेकापचे जयंत पाटील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप मोर्चात सहभागी झाले आहेत.
राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत
राज्यभरातून महाविकास आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकरेगट, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
मागणी काय?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी कडाडून विरोध केला. कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.ही या मोर्चातील आग्रही मागणी आहे. शिवाय महापुरूषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची मागणी करावी, अशीही मागणी महाविकास आघाडीची आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या ऐरणीवर आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. हाही मुद्दा या महामोर्चात आहे. शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मविआची मागणी आहे.
महाविकास आघाडीने या मोर्चाचं मोठं नियोजन केलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी खास व्हॅनिटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे. ही व्हॅनिटी व्हॅन पूर्णपणे वातानुकुलित आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खुर्च्या, सोफे, बेड आणि टीव्ही आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे. प्रमुख नेते थोडावेळ या व्हॅनमध्ये बसतील. त्यानंतर ते मोर्चातून पायी चालणार आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले मोर्चातून पायी चालणार असल्याची माहीत आहे.