पिंपरी-चिंचवडनंतर पुणे महापालिकेसाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर बैठकीचं आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: महापालिकेसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतलाय. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : राज्यात आगामी माहापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालीय. अशावेळी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: महापालिकेसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतलाय. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Sharad Pawar will hold a meeting of NCP on the backdrop of Pune Municipal Corporation elections)
शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार- जगताप
दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते.
सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी 44, काँग्रेस 9 आणि शिवसेनेकडे 9 जागांचं बळ आहे.
पुणे महापालिका पक्षीय बलाबल
- भाजप 99
- काँग्रेस 09
- राष्ट्रवादी 44
- मनसे 2
- सेना 9
- एमआयएम 1
- एकूण 164
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत रणशिंग फुंकलं आहे. त्यावेळी त्यांनी ज्या पक्षाने शहराची उभारणी केली, त्या पक्षाला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन पवारांनी केलंय. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय.
फडणवीस दखल घेणार का?
महापालिका निवडणुकीसाठी एकीकडी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोर लावला आहे. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांमध्ये नाराजी आणि गटबाजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या :
गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा
प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिवाळीनंतर होणार जाहीर; नाशिकमध्ये इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
Sharad Pawar will hold a meeting of NCP on the backdrop of Pune Municipal Corporation elections