पवारांनी थेट कणकवलीत जाऊन राणेंची भेट घेण्यामागचं कारण काय?
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. शरद पवार सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या भेटीला राजकीय रंग असला तरी या दोन्ही नेत्यांनी मात्र याला स्पष्ट नकार दिलाय. कोकणातील राजकारणात काही तरी नवीन घडामोड घडणार असल्याचं बोललं जातंय. काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर […]
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. शरद पवार सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या भेटीला राजकीय रंग असला तरी या दोन्ही नेत्यांनी मात्र याला स्पष्ट नकार दिलाय. कोकणातील राजकारणात काही तरी नवीन घडामोड घडणार असल्याचं बोललं जातंय.
काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यांनतर ते एनडीएत सहभागी झाले आणि भाजपच्या साहाय्याने राज्यसभेचे खासदार बनले. 2019 च्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने शिवसेनेशी युती केली तर एनडीएतून बाहेर पडणार असल्याचं राणेंनी आधीच जाहीर केलंय. याच संधीचा फायदा घेऊन पवारांनी राणेंना चुचकारलं असल्याचं बोललं जातंय.
दीपक केसरकर, उदय सामंत राष्ट्रवादी पक्ष सोडून गेल्यामुळे कोकणात राष्ट्रवादीची ताकद कमी झालीय. राणेंच्या साथीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी कोकणात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असेल हे नाकारता येत नाही. गेले काही दिवस राणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी संधान बांधणार असल्याच्या चर्चांना उत आलेला असतानाच या भेटीने शिक्कामोर्तब केलं.
नारायण राणेंचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणे संपले, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. शरद पवार यांच्यासारखा निष्णात आणि पुढचं पाहणारा राजकारणी घरी येऊन राणेंची भेट घेतो यातच राणेंचा करीष्मा अजूनही राज्याच्या राजकारणात संपलेला नाही हेच सिद्ध होतं, असं राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांचं म्हणणं आहे.
सिंधुदुर्गवर अजूनही राणेंची पकड आहे हे चार वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनी दाखवून दिलंय. राणे-पवार भेटीमुळे, कोकणात राणेंच्या साथीने हातपाय पसरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला हा मोठा धक्का आहे. राणे पवार भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून कोकणातील हा एक्का पवारांच्या जोडीला जाणार का? याबाबत सध्या तरी उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या तरी ही भेट भाजपची डोखेदुखी वाढवणारी ठरलीय असं म्हणता येईल.