काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत मी ‘यांच्या’मुळे उतरलो, शशी थरूर माध्यमांसमोर दिलखुलास….
Congress President election: शशी थरुर यांच्या पाठिशी काँग्रेस कार्यकर्त्यांचं मोठं समर्थन असल्याचं म्हटलं जातंय.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता दोन स्पर्धक स्पष्ट झालेत. मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर. सोशल मीडिया आणि आपल्या लेखांच्या माध्यमातून सातत्याने विविध भूमिका मांडण्याऱ्या शशी थरूर (Shashi Tharur) यांची लोकप्रियता बरीच आहे. तरीही पक्षाध्यक्ष (Congress President) पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी आपल्याला कुणी प्रोत्साहन दिलं, याचा खुलासा थरूर यांनी प्रथमच माध्यमांसमोर केलाय.
शशी थरूर म्हणाले, काँग्रेसमध्ये जशी लोकशाही आहे, ती इतर पक्षांमध्ये आता दिसत नाही. पक्षात निवडणुका घेणं का आवश्यक आहे, यावर मी एक लेख लिहिला होता… त्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांनी मला फोन केले. माझ्याशी संपर्क साधला. मला निवडणूक लढवण्याची विनंती केली, त्यामुळेच मी या निवडणुकीत उतरलो, अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.
काँग्रेस खासदार शशी थरूर आज शनिवारपासून महाराष्ट्रातून निवडणुकीची प्रचार मोहीम सुरु करत आहेत. चार वाजेच्या सुमारास ते नागपुरात पोहोचणार असून दीक्षाभूमीत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जातील, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी दिली.
शशी थरुर हे केरळमधील तिरुअनंतपुरम येथील खासदार आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची व्यवस्था आशिष देशमुख यांनी केली आहे.
कांग्रेस पार्टी के अंदर जो लोकतंत्र था उसको हम दिखा रहा हैं यह कोई और पार्टी के अंदर नहीं है… मैंने एक लेख लिखा था कि पार्टी में क्यों चुनाव जरूरी है जिसके बाद पार्टी के कई लोग और कार्यकर्ताओं ने संपर्क कर मुझे चुनाव लड़ने के लिए कहा: कांग्रेस अध्यक्ष पद के उम्मीदवार शशि थरूर pic.twitter.com/TcPf8BUxaU
— ANI_HindiNews (@AHindinews) October 1, 2022
66 वर्षांचे शशी थरूर यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केलाय. आज पाच वाजेच्या सुमारास ते नागपुरात पोहोचतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देतील. त्यानंतर नागपुरात एक पत्रकार परिषद घेतील.
काँग्रेस नेते आशिष देशमुख म्हणाले, शशी थरुर लोकप्रिय काँग्रेस खासदार आहेत. त्यांनी आंतराराष्ट्रीय स्तरावर देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पक्षातल्या विकेंद्रीकरणासाठी अध्यक्ष पदाची ही निवडणूक महत्त्वाची आहे. 12 राज्यांतील काँग्रेस प्रतिनिधींचा शशी थरूर यांना पाठींबा आहे. देशभरातून त्यांना खूप समर्थन मिळत असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केलाय.
19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय होईल.