नवी दिल्ली : भाजप नेते आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला रामराम ठोकत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या पक्षप्रवेशानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. यावेळी ”माझ्या भाजप सोडण्याच्या निर्णय घेतला हे जेव्हा लालकृष्ण अडवाणींनीना समजले, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. मात्र त्यांनी माझ्या या निर्णयाला विरोध न करता, मला भरभरुन आशिर्वाद दिले”, असे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हांनी अडवाणी यांच्याबाबत बोलताना केले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य दिले.
नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना लालकृष्ण अडवाणी आणि तुमचं राजकीय नातं कसे होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मी भाजप सोडणार आहे हे अडवाणींना माहित नव्हतं. पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना याबाबत माहिती दिली. भाजप सोडल्यानंतर माझ्या नवीन राजकीय प्रवासासाठी मी त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो. तेव्हा मला बघताचं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या परिस्थितीतही त्यांनी मला भरभरुन आशिर्वाद दिला. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान अडवाणींना एकदाही मला ‘जाऊ नको’ किंवा ‘थांब’ असे सांगितले नाही. असे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणींबाबत बोलताना केलं.
भाजप स्थापनेच्या दिवशी म्हणजेच 6 एप्रिलला शत्रुघ्न सिन्हांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून बिहारच्या पाटना साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हांचा सामना होईल.
काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपमधील आठवणी जागवल्या. ”भाजप हा लोकशाहीवादी पक्ष होता मात्र आता त्या पक्षाची वाटचाल हुकूमशाहीकडे झाली आहे. आज सर्व कामं पंतप्रधान कार्यालयातून होत आहेत. कोणत्याही मंत्र्याला अधिकार नाहीत, सर्व मंत्री भीतीत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकलं आहे. मी सत्याच्या बाजूने उभं राहणं ही माझी चूक ठरली, असा घणाघात शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यावेळी केला.”
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापले आहे. गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी सलग 6 वेळा निवडून आलेत. मात्र यंदा या लोकसभा मतदारसंघात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणींचे तिकीट कट करत अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.
यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. ”पक्षाच्या स्थापनेपासून भाजपने आपले राजकीय शत्रू असणाऱ्यांचा कधीही विचार केलेला नाही, पण फक्त विरोधक म्हणून विचार केलाय, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं होतं.