बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या आधीच शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?
या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. शिंदे हे कोणत्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाला घेरतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शिंदे गटाने आता मुंबईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गट मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या एक दिवस आधीच शिंदे गटाने दादरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून शिंदे गट आपली ताकद दाखवणार असून मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन येत्या 17 नोव्हेंबरला आहे. त्यापूर्वीच म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाने मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दादरच्या वीर सावरकर स्मारकात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
शिंदे गटाच्या या मेळाव्यात सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला प्रचंड गर्दी करण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.
दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे शिवतिर्थावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट कामाला लागला आहे.
दादरला 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गटाकडून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. शिंदे हे कोणत्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाला घेरतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मात्र, असं असलं तरी मुंबईत आपली ताकद आहे आणि आपण ठाकरे गटाला जेरीस आणू शकतो हे दाखवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे तुरुंगातून सुटले आहेत. त्यांची करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ईडीसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीर शिंदे काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.