मुंबई महापालिकेत दाखवून देऊ पळपुटं कोण आहे? ; ‘या’ नेत्याने पुन्हा ठाकरे गटला डिवचले
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने या पोटनिवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र आता भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने या पोटनिवडणुकीत भाजपाला (BJP) पाठिंबा दिला होता. मात्र आता भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघारीनंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकोंमेकांवर आरोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. संवेंदनशिलता म्हणून आम्ही पोटनिवडणुकीतून माघार घेतली तर आम्हाला पळपुटे म्हणता. मुंबई (Mumbai) महापालिकेत दाखवून देऊ कोण पळपुटे आहे ते असा इशारा सामंत यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
सामंत यांनी नेमकं काय म्हटलं?
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही संवेदनशिलता म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली तर हे आम्हाला पळपुटे म्हणतात. संवेदनशिलता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी देखील पत्र पाठवले होते. शदर पवार यांनी देखील अर्ज मागे घेण्यात यावा असे म्हटले होते. उमेदवारी अर्ज माघे घेईपर्यंत सर्व गप्प होते. मात्र त्यानंतर पळपुट म्हणून टीका सुरू झाली. आम्हीपण मुंबई महापालिकेत दाखवून देऊ पळपुटं कोण आहे, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपाने ऐनवेळी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.