नागपूर : राज्यसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपाचे धनंजय महाडीक ( Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. यामुळं राज्यातील जनता खूश आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जनताच नव्हे, तर आमदार वैतागले आहेत. आमदार म्हणतात, आमच्याकडून मंत्री कमिशन घेतात. मंत्री, आमदारांना मुख्यमंत्री भेटत नाही. यांच्या सावळा गोंधळामुळं सर्वांना आठवण फडणवीस यांच्या काळाचीच येत आहे, असं मत अनिल बोंडे यांनी नागपुरात व्यक्त केलं. राज्यातली जनता म्हणते पुन्हा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पाहिजे. संजय राऊतांचं बोलणं थांबविलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल, अशी कुजबूज शिवसेनेत सुरू आहे. संजय राऊत यांच्याकडंही यंत्रणा आहे. त्यांनी त्या यंत्रणेचा दुरुपयोग केला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आतमध्ये टाकलं. त्यांना कैदेत टाकायला कोर्टानं नाकारलं. रिपब्लिक टीव्हीच्या संपादकांना आतमध्ये टाकलं. तेव्हाही कोर्टानं नाकारलं. बदल्याच्या भावनेनं संजय राऊत पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. पण, दुर्दैवानं यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.
राज्यसभेवर निवडून आल्यानंतर ते नागपुरात पहिल्यांदा आले. त्यावेळी बोलत होते. जे राज्यसभेत झालं ते विधान परिषदेत होणार, अशी ग्वाही अनिल बोंडे यांनी दिली. अपक्ष आमदार घोडेबाजारात खपले असा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यामुळं अपक्ष आमदारही बदनाम झालेत. अशाप्रकारचा गाढवपणा कोणी करणार नाही. तीन लाख लोकांनी निवडून दिलेला अपक्ष आमदार हा पैशानी खपतो. असं वारंवार संजय राऊत सांगतात. हा लोकप्रतिनिधींचा मोठा अपमान आहे. त्यामुळं आता अपक्षही सद्सद् विवेकबुद्धीला जागतील.
कुणी मतदार केलं कुणी केलं नाही. यासाठी पुरावे मिळेपर्यंत कुणाचाही अपमान करू नये. आमदारांचा अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात. भाजपत सर्वांना न्याय दिला जातो. छत्रपती संभाजी राजेंचा अपमान शिवसेनेनंच केला आहे. आम्ही एका मावळ्याला खासदार भाजपनं बनविलं, असंही अनिल बोंडे म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. आणखी त्या मोठ्या होतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.