Eknath Shinde : बीडमध्येही शिवसेनेला खिंंडार; नाराज शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, कुंडलिक खांडे नवे जिल्हाप्रमुख
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतून (Shiv sena) बाहेर पडण्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता बीडमधील नाराज शिवसैनिक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.
बीड: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतून (Shiv sena) बाहेर पडण्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना आमदारांनी पाठिंबा दिला होता. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील खासदारांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. एवढचं नाही तर राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. शनिवारी बीडमध्ये (Beed) देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. बीडमधील नाराज शिवसैनिकांचा गट शिंदेंच्या गळाला लागला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख करण्यात आले आहे. कुंडलिक खांडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्तीची घोषणा होताच त्यांनी शनिवारी बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसैनिकांचा छळ सुरू असल्याचा आरोप यावेळी खांडे यांनी केला आहे.
पोस्टरवरून आदित्य, उद्धव ठाकरेंचे फोटो गायब
दरम्यान शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होताच ते बीडमध्ये दाखल झाले, त्यांनी बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र कार्यक्रमस्थळी लावलेल्या बॅनरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठारे यांचे फोटो गायब होते. त्याजागी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांचे फोटो बॅनरवर दिसून आले. यामुळे बीड जिल्ह्यात आता शिवसेनेत फूट पडल्याचे उघड झाले आहे. खांडे यांनी शनिवारी बीडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बीडप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात आता शिवसेनेमध्ये फूट पडत आहे. औरंगाबाद, ठाणे, नवी मुंबई आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यातील शिवसैनिक हे शिवसेनेमधून शिंदे गटात सामील झाले आहेत.
‘महाविकास आघाडीत शिवसैनिकांचा छळ ‘
दरम्यान शिंदे गटात सामील झाल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसैनिकांचा छळ केला असा थेट आरोप खांडे यांनी केला आहे. ग्रामपंचायतपासून तर जिल्हा परिषद सदस्यापर्यंत राष्ट्रवादी नेत्यांनी आमचा छळ केला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला पसंत पडला म्हणून आम्ही शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या काळात बीडमध्ये केवळ शिंदे पॅटर्न दिसेल असाही विश्वास खांडे यांनी व्यक्त केला आहे.