Sanjay Raut : शिवसेनेचे 14 आमदार फुटणार का?; संजय राऊत म्हणाले, खासदार कुठे गेले तरी…
Sanjay Raut : शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्रं लिहून घेणार आहात का? तशी चर्चा आहे, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, शिवसैनिक एकनिष्ठच असतो. या चर्चेविषयी माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) 39 आमदार फुटल्यानंतर आता 19 पैकी 14 खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत हा शब्द चुकीचा आहे. काल बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला भाजपच्या (bjp) एका शाखेने बोलावलं होतं. त्यामुळे मी बैठकीला नव्हतो. पण या विषयी पक्षप्रमुखांशी माझं बोलणं झालं. त्यांनी खासदारांच्या भावना काय आहेत त्यावर चर्चा केली. चर्चा होऊ शकते. ती चर्चा आधीही झाली असती. यावर खासदार गेले, खासदार जातात असं होत नाही. सेनेत आमदार खासदार निवडून आणण्याची ताकद आहे. शेवटी खासदार कुठे गेले तरी खालची कार्यकर्त्यांची फळी आणि मतदार पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने आहे. हे लक्षात घ्या, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
हा जो पक्षाचा कार्यकर्ता तो कोणत्याही दाब दबावाला, मोहाला बळी पडत नाही. त्यातील आम्ही आहोत. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी पडलो असतो तरी मी शिवसेना सोडली नसती. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत राहिलो असतो. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांचा माणूस आहे. आम्ही म्हणजे वरवरचे बुडबुडे नाही. बुडबुडा आला आणि फुटला. जे बुडबुडे होते ते फुटले. त्यामुळे खासदार फुटणार या चुकीच्या बातम्या आहेत. मात्र, खासदारांच्या भावना पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या आहेत, असं राऊत म्हणाले.
ठाकरे शिवसेना एकच
काँग्रेस खूप वेळा फुटली. प्रत्येकजण म्हणतो आम्ही गांधीच्या विचाराचे आहोत. पण मूळ काँग्रेस कोणती आहे? इंदिरा गांधींचीच राहिली ना. इंदिरा गांधींचीच आहे. महाराष्ट्रात चार काँग्रेस आहेत. त्यामुळे अशा बोलण्याला अर्थ नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे. ठाकरे शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
शिंदेंवरील कारवाई योग्यच
शिवसैनिकांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्रं लिहून घेणार आहात का? तशी चर्चा आहे, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, शिवसैनिक एकनिष्ठच असतो. या चर्चेविषयी माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच एकनाथ शिंदेंवरील कारवाईचं त्यांनी समर्थन केलं. शिस्तभंगाची कारवाई आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंनी त्यांची नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.