Shiv Sena : ‘एअरपोर्टवरुन उतरले की विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतून जातो’, आदित्य ठाकरेंच्या भाषणातले 10 मोठे मुद्दे
एअरपोर्टवरुन उतरले की विधान भवनात (Vidhan Bhavan) जाणारा रस्ता वरळी, परळ आणि वांद्रेतून जातो', अशा धमकीवजा इशारा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलाय.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. अशावेळी शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बैठकांचा धडाका लावलाय. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज युवासेनेचा जाहीर मेळावा पार पडला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ‘फ्लोर टेस्टसाठी त्यांना मुंबईत यावच लागेल. एअरपोर्टवरुन उतरले की विधान भवनात (Vidhan Bhavan) जाणारा रस्ता वरळी, परळ आणि वांद्रेतून जातो’, अशा धमकीवजा इशारा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलाय. आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे पाहूया…
- कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितल्यावर मला माझी उमेदवारी जाहीर झाली तो दिवस आठवतो. माझा आवाज जरी इथपर्यंतच हॉलमध्ये येत असला तरी तुमचा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचलाय. भास्करराव तुम्ही बरोबर बोललात की, मुंबईवर भाजपचा डोळा आहे. मुंबईत एवढे वर्षे आपण शिवसेना म्हणून राहिलो आहोत. जरी मुंबईवर कुणाचा डोळा असला तरी आपण मुंबईला कुणाची नजर लागू दिलेली नाही.
- ज्यांनी हाऊसमध्ये ताकद दाखवली तो आवाज भास्करराव आमच्या बाजूला बसले आहेत. सचिन अहिर, महापौर आहेत. गेले दोन चार दिवस शिवसैनिकांमध्ये जे वातावरण आहे, सगळीकडे जोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय. शिवसेनेतून घाण निघून गेली आहे, आता सर्व चांगलंच होईल.
- एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. पण राजकारण म्हटल्यावर लोकं कशी बदलू शकतात हे आपण अनेक वर्षे बघितलं आहे. मात्र, एक प्रश्न पडतो की या लोकांना आपण काय कमी केलं आणि काय कमी दिलं? किती लोकांवर अन्याय झाला, हे आता दिसून येत आहे.
- उद्धव ठाकरे जेव्हा फेसबुक लाईव्ह केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आईही मला बोलली. आम्हाला वर्षा बंगल्याचा मोह कधी नव्हताच. आधी आपण पाहिलं की पुन्हा येईन, पुन्हा येईन चालायचं. भिंतीवर कुणी काही लिहून ठेवलेलं. बंगला सोडायला कित्येक मंत्री तयार नसतात. ज्यावेळेला फेसबुक लाईव्ह ठरलं, 5 ची वेळ ठरली. काय झालं कोणास ठावूक, काही तांत्रिक अडचण आली. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आदित्य बॅगा भरा आपल्याला वर्षा बंगला सोडायचा आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळणार, ज्याला कुठलाही मोह नाही.
- हे काही मित्र पक्षामुळे नाही, विरोधी पक्षामुळे नाही, तर आपल्याच लोकांमुळे हा दगाफटका झाला आहे. जेव्हा कधी समोर बसलेल्या आपल्या लोकांना आपण पद देतो… संदीपान भुमरे असो, प्रकाश आबिटकर असो यांना काय कमी केलं. मी स्वत: फंड दिला. जेव्हा हीच माणसं दगा देतात, समोरून बोलायला लागतात तेव्हा वाटतं आपलं नेमकं काय चुकलं?
- जेव्हा मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला. तेव्हा शिवसैनिक अक्षरश: रडत होते. मला अनेकांचे फोन मेसेज आहे. फेसबुक, ट्विटरवर मी पाहत होतो. ज्यांना राजकारण कळतं पण ते कुठल्याही पक्षाचे नाहीत. ज्यांना राजकारण कळतं पण ते सक्रीय राजकारणात नाहीत, अशा लोकांनी मला सांगितलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून तर चांगले आहेतच. पण माणूस म्हणून ग्रेट आहेत.
- संपर्कात असलेल्या 17 ते 18 आमदारांना पळवून आणि किडनॅप करुन नेले आहे, असे त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केली आहे. गुवाहाटीत एका बाजूला या आमदारांचा रोजचा जेवणाचा खर्च नऊ लाख रुपये आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पूरस्थितीत लोकांना जेवायचे अन्न नाही.
- जेव्हा हे आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत उतरलीत, बांद्राहून येतील आणि वरळी, भायखळ्यातून त्यांना जावे लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. एक फ्लोअर टेस्ट आत होईल तर दुसरी बाहेर होईल. तसेच केंद्र सरकार ही टेस्ट घडवून आणण्यासाठी केंद्रीय बळाचा वापर करेल पण शिवसैनिक शिवसैनिक आहेत.
- हिंमत असेल, शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामे पाठवा आणि आमच्याविरोधात निवडणुकीला तयार राहा. दगाबाजांना आता महाराष्ट्रात जागा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीनं बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचं ठरवलं आहे.
- जे पळून गेले आहेत, त्यांना महाराष्ट्रातून पळवून लावायचं आहे. त्यात आपलाच विजय होणार आहे. आपण अयोध्येला गेल्यानंतर जे झालं ते चांगलंच झालं. आजा ते झालं आहे, त्यापेक्षाही चांगलंच होईल.