नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Shiv sena BJP alliance in Niphad Panchayat Samiti )
या भेटीची चर्चा अद्याप शांत झालेली नाही. भलेही ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असली, तरी त्याचे राजकीय परिणाम येत्या काळात पाहायला मिळतील असं राजकीय विश्लेषक सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर तिकडे निफाडमध्ये अनोखं चित्र पाहायला मिळालं. निफाड पंचायत समितीच्या सभापती निवडीत शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे निफाड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असूनही, भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या रत्ना संगमनेरे सभापतीपदी तर भाजपचे संजय शेवाळे उपसभापतीपदी निवड झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
VIDEO : संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट
यापूर्वी 2017 मध्ये निफाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती न करता स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युती सरकार होतं. मात्र आता चित्र उलट असताना, निफाडमध्ये आधीचीच पुनरावृत्ती दिसत आहे. त्यावेळी 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 10 , भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि अपक्ष 4 जागांवर विजयी झाले होते.
त्यावेळी अपक्ष सदस्य गुरुदेव कांदे यांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र त्यावेळी भाजपाचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांनी पाठिंबा दिल्याने, उपसभापतीपदी संधी दिली जाईल असा शब्द माजी आमदार अनिल कदम यांनी दिला होता. तो शब्द अनिल कदम यांनी आज पाळला.
निफाड पंचायत समितीच्या आजच्या सभापती- उपसभापतीपदाच्या निवडीदरम्यान, शिवसेनेच्या शिवडी गणाच्या सदस्या रत्ना संगमनेरे यांची सभापतीपदी तर विंचूर गणाचे सदस्य भाजपाचे संजय शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप एकमेकाला पाण्यात पाहात असले तरी, निफाडमध्ये शिवसेना-भाजपाची ही अनोखी युती यानिमित्ताने दिसून आली.
(Shiv sena BJP alliance in Niphad Panchayat Samiti )
संबंधित बातम्या
आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य
EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?