मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईने आता टोकाची भूमिका घेतली आहे. शाब्दिक चकमक, आरोप आणि धमक्या, ट्विटर वॉर, रस्त्यावरची लढाई आणि आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात प्रचंड वितुष्ट आलं आहे. शिंदे गटातील आमदारा माघारी फिरणार नसल्याचं लक्षात आल्यानंतरच शिवसेना (shivsena) अधिक आक्रमक झाली आहे. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनीही शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. म्हणूनच ते घाबरून गुवाहाटीला जाऊन बसले आहेत, असा हल्लाबोल सुभाष देसाई यांनी केला आहे. सुभाष देसाई यांनी पहिल्यांदाच बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांना देसाई यांनी धमकावलंही आहे.
गोरेगाव येथे उत्तर भारतीय कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुभाष देसाई बोलत होते. शिवसेना भवनात डाका टाकण्यात आला आहे. बंडखोर आमदार महाराष्ट्रात कोणत्याही बिळात असते तर पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. त्यामुळेच ते घाबरून गुवाहाटीला जाऊन लपले आहेत. धमक्या देत आहेत. सत्ता परिवर्तनाचं स्वप्न पाहत आहेत, असा हल्लाबोल देसाई यांनी केला.
ज्या दिवशी हे बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेना भवनात दाखल होतील. इतरांना एअरपोर्टवरून बाहेर पडूच दिलं जाणार नाही. 72 तासांपेक्षा अधिक विमानतळाला घेरावा घालण्यात येईल, अशी धमकीच सुभाष देसाई यांनी दिली आहे.
जेव्हा शिवाजी महाराजांचा विजय असो अशी घोषणा दिली जाते. तेव्हा शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूंच्या मनात भीती निर्माण करते. अशावेळी शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार मुंबईत यायला घाबरणार नाही तर काय होईल? असा सवाल त्यांनी केला. जेव्हा जेव्हा शिवसेनेविरोधात कुणी बंड केलं. त्या त्या वेळी त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. एकनाथ शिंदेही तोंडावर आपटतील, असा दावाही त्यांनी केला.