Uddhav Thackeray | घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा, राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
राज्यपालांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठी माणसाचं मीठ खाल्लं आहे. मराठी माणसाचं प्रेम त्यांनी पाहिलं पण मराठी माणसांत फूट का पाडतात. राज्यपालांना आता घरी पाठवायची वेळ आली आहे. किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगातही पाठवायची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना प्रमुख (Shivnsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय. तसेच राज्यपालांनी केलेलं हे अनावधानाने आलं नसून यामागे दिल्लीतलं राजकारण असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. काल एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांचा पैसा काढून घेतला तर ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य केलं. त्यावरून राज्यभरात टीकेची झोड उठली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विशेष पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर सणकून टीका केली.
कोल्हापूरी जोड्यांची वेळ आलीय…
राज्यपालांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करेल, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे….
खुर्चीचा मान ठेवला पाहिजे…
राज्यपालांना त्यांच्या पदाची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील. काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील.. ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे.. मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यानी पत्रं दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्येच सावित्रीबाई फुलेंबद्दल हिणकस उद्गार काढले. आजही त्यांनी तसेच उद्गार काढले. महाराष्ट्रात राहत आहेत. महाराष्ट्रात राहून सर्व काही ओरपले आहे, पंगत बिंगत मान मरातब घेतला आहे. आणि महाराष्ट्रातच मराठी माणसाचा अपमान केला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.