संजय राठोडांना पोहरादेवीची गर्दी भोवणार, राजीनाम्याबाबत शिवसेना लवकरच निर्णय घेणार: सूत्र

| Updated on: Feb 25, 2021 | 9:58 AM

संजय राठोड यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. | Sanjay Rathod resignation

संजय राठोडांना पोहरादेवीची गर्दी भोवणार, राजीनाम्याबाबत शिवसेना लवकरच निर्णय घेणार: सूत्र
Follow us on

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा लवकरच राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या (Shivsena) गोटात हालचाली सुरु झाल्याचे समजते. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करुन उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे आता हेच कारण पुढे करुन संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Speculation about Shivsena may take Sanjay Rathod resignation)

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तो राजीनामा स्वीकारला नव्हता. मात्र, आता उद्धव ठाकरे हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

संजय राठोड यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. या भेटीसाठी संजय राठोड यांना तब्बल पावणेदोन तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी केवळ दोन मिनिटे जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला होता. हा सारा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप होऊनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई केली नव्हती. शिवसेनेच्या काही नेत्यांकडून संजय राठोड यांचे अप्रत्यक्ष समर्थनही केले जात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरही कोरोनाच्या काळात पोहरादेवीत गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केल्यामुळे संजय राठोड पक्षनेतृत्त्वाच्या मनातून उतरल्याची चर्चा आहे. विशेष महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि आधारस्तंभ शरद पवार यांनीही या सगळ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाण प्रकरणात टीकेचा भडीमार रोखण्यासाठी अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राठोडांसाठी शिवसेनेचं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’?

पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत आता शिवसेनेनं (Shivsena) खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.

संबंधित बातम्या:

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली, मुख्यमंत्री-राठोड भेटीचा इतिवृत्तांत

(Speculation about Shivsena may take Sanjay Rathod resignation)