Shiv Sena BJP clashes नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर शहरातच शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपात (BJP) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात सहापैकी दोन जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे. दोन जागा मिळाल्या नाहीत, तर सहाही जागा पाडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच शिवसेनेनं भाजपला दिला आहे. भाजपनंही शिनसेनेला त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं आहे. त्यामुळेच आता सेना-भाजपात जागावाटपावरुन मुख्यमंत्र्यांच्या शहरातूनंच वादाची सुरुवात होऊ शकते.
नागपुरातील सहा जागांपैकी एक दक्षिण-पश्चिम नागपूर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही जागा आहे. त्यामुळे दबाव निर्माण करुन नागपुरातील सहापैकी दोन जागा मिळवण्याचा सेनेचा हा डाव असल्याचंही बोललं जात आहे. पूर्व आणि दक्षिण नागपूर या भाजपकडे असलेल्या दोन जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे.
शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे. पण भाजपंही शिवसेनेला त्याच शब्दात उत्तर देत आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपचे 111 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे अवघे दोन नगरसेवक आहे. नागपूर शहरात सहापैकी सहाही आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या, त्या जागांवर भाजप मागे हटणार नाही, शिवसेनेने खोट्या आत्मविश्वासात राहू नये, या शब्दात भाजपचे शहर अध्यक्ष प्रविण दटके यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.
हे झालं नागपूर शहरापुरतं. पण भाजप विदर्भातल्या कुठल्याच विधानसभा जागेवर शिवसेनेशी तडजोड करण्याच्या तयारीत दिसत नाही. हेच चित्र राज्यभरंही असू शकतं. गेल्या निवडणुकीत विदर्भातील 62 पैकी तब्बल 44 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळेसंही भाजपची विदर्भावरच जास्त भिस्त आहे.
त्यामुळे जागांबाबत तडजोड न करण्याचा स्पष्ट इशाराच भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी शिवसेनेला दिला आहे. विदर्भात शिवसेनेची ताकद नसल्याचंही व्यास म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी युतीसाठी भाजप नेत्यांचं वक्तव्य आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याच नेत्यांचं वक्तव्य. वेळेनुसार भाषा बदललेली दिसून येत आहे. यावरुन युती झाली तरी भाजप आपल्या जिंकलेल्या जागांबाबत तडजोड करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. कारण प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा आहे.