शिवसेनेशी विश्वासघात केला, आता दोन वर्षांनी घरी बसणार; शिवसेनेचा शहाजीबापूंना थेट इशारा
शिवसेनेकडून पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार शाहाजीबापू पाटलांवर निशाणा साधण्यात आला आहे. पक्षासोबत विश्वासघात केला आता दोन वर्षानंतर घरी बसायचं असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
परभणी : शिवसेना (Shiv Sena) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांवर (Shahajibapu Patil) जोरदार निशाणा साधला आहे. शहाजीबापू पाटलांना उगच मोठं करून ठेवलं आहे. काय तो त्यांचा डायलॉग, त्यामध्ये कुठेतरी निष्ठा दिसून येते का असा सवाल भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. सहावेळेस पडले, मात्र जेव्हा शिवसेनेकडून उभे राहिले तेव्हा ते निवडून आले. त्यांच्या पाठिमागे शिवसेनेचं चिन्ह होतं. शिवसेनेने त्यांना निवडून आणण्याचं कामं केलं आणि त्यांनी आता शिवसेनेसोबतच विश्वासघात केल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. शहाजीबापू पाटील हे सहावेळेस पडले. जेव्हा ते शिवसेनेकडून उभे राहिले तेव्हा ते निवडून आले. मात्र त्याच शिवसेनेसोबत त्यांनी विश्वासघात केला. तुम्ही शाहाजीबापू पाटील यांना उगच मोठं करून ठेवलं आहे. काय त्याचं ते वाक्य त्यात कुठेतरी निष्ठा दिसते का असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी शहाजीबापू पाटील यांना इशारा देखील दिला आहे. तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलात. पाच वर्षांपैकी तीन वर्ष संपले आहेत आता फक्त उरले दोन वर्ष असं जाधव यांनी म्हटलं आहे.
निधीत वाटपात दुजाभाव
भास्कर जाधव हे हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यापूर्वी त्यांनी आज परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी शहाजीबापू पाटलांसोबतच संदीपान भूमरे यांच्यावर देखील टीका केली आहे. तसेच निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला आहे.