‘बीकेसी’वर आणलेल्या लोकांना हेही माहिती नव्हते ते तिथे कशासाठी चालले आहेत; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटाला खोचक टोला
बुधवारी बीकेसीवर शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यावरून शिवसेनेनं शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : बुधवारी बीकेसीवर (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यावरून शिवसेना नेते वरुन सरदेसाई यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जे लोक उपस्थित होते त्यातील अनेकांना आपण तिथे कशासाठी चाललो आहोत?, कोणाच्या सभेला चाललो आहोत हेच माहिती नव्हतं असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ज्या लोकांना विचारण्यात आलं की तुम्ही बीकेसीवर का जात आहात तर त्यातील काही जणांनी सांगितलं आम्ही बीकेसीवर राम शिंदे यांचं भाषण ऐकायला जात आहोत, तर काही जणांनी सांगितलं उद्धव ठाकरेचं भाषण ऐकायला जात आहोत असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की मी माझ्या मीडियातील बांधवांना चॅलेंंज करतो की, काल उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिवाजी पार्कवर आले होते. त्यातील कोणालाही विचारा तुम्ही शिवाजी पार्कवर का आलात त्यांचं उत्तर एकच असेल आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी आलो आहोत, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलो आहोत. ते त्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर असलेली निष्ठा व्यक्त करतील असं वरुन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
निष्ठावंतांचा मेळावा
काल उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी दुपारी चारची वेळ देण्यात आली होती. चार वाजता मैदान खचाखच भरलं होतं. दादरपर्यंत लोक होती. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिल्यानंतर देखील शिवसैनिक येतच होती, यावरून दिसून येत की जनतेचा पाठिंबा कोणाला आहे. हा निष्ठावंतांचा मेळावा होता असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.