मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचं (Rajya sabha election) वारं वाहतंय. शिवसेना खासदार संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देतील असं सुरूवातीच्या काळात बोललं जात होतं. पण, संभाजीराजेंना शिवबंधनाची अट घालून शिवसेनेनं त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवलं. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेचे कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहर लावली. आता शिवसेनेचं सगळं काही ठरलेलं असताना भाजप आणि काँग्रेसचं काहीही ठरल्याच दिसत नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने उमेदवारांची नावं घोषित होणार असल्याचं दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस नेमकं कुणाला उमेदवारी देणार, हे पहावं लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावरून बुधवारी परतले. आता एक-दोन दिवसात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होऊन देशभरातील राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित होतील. त्याचवेळी भाजपचे महाराष्ट्रातील दोन उमेदवार कोण? याचा निर्णय होईल आणि सोबतच तिसरी जागा लढवायीच की नाही, हेही ठरेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर तिसरी जागा निश्चितच लढवू आणि नक्कीच जिंकू दोन उमेदवार देण्याच्या नादात आपला पहिला उमेदवार पडणार नाही, याची काळजी शिवसेनेनं घ्यावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय.
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या ही सहा आहे. यात भाजपकडून दोन खासदार राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना (Shivsena) यांच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक जागा निवडून दिली जाणार आहे. तर एका जागेच गणित अजूनही कुणाच्या खात्यात जाणार हे ठरत नाही. या जागेवर सध्या शिवसेनेकडून दावा करण्यात येतोय. मात्र हे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होतील. मात्र शिवसेने ही जागा काबीज करण्यासाठी कंबर कसताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे तर भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत आता नवं ट्विस्ट आलंय.