‘हे कर्णपुरा देवी, गद्दारीच्या पिकाचा नायनाट कर’ औरंगाबादेत आरती करुन अंबादास दानवेंची प्रार्थना
दसरा मेळाव्याला जायला निघण्याआधी अंबादास दानवेंनी चंद्राकांत खैरेंच्या सोबत केली कर्णपुरा देवीची आरती
दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटावर (Eknath Shinde Group) टीका केली. गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dussehra Melava) ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेतून परिवर्तनाची लाट येईल, असंही विधान त्यांनी केलं. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवीची सकाळीच आरती केली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला निघण्याआधी त्यांनी दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी ग्रामदेवतेला साकडं घातलं.
अब्दुल सत्तार यांच्याकडून 500 गाड्या सोडण्यात आल्याचा फसवा दावा करण्यात आल्याचा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला. 500 गाड्या कुठेही नाहीत, या सगळ्या वल्गना आहेत, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. आम्ही एसटी महामंडळाकडूनही माहिती काढल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे औरंगाबादमधील शिवसैनिकांना घेऊन दसरा मेळाव्यासाठी रवाना होणार आहे. त्याआधी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह औरंगाबादच्या कर्णपुरा देवीची आरती केली. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याला यश मिळू दे, अशी प्रार्थना यावेळी शिवसैनिकांनी केली.
ठाकरे विरुद्ध शिंदे अशी तोफ आज धडाडणार आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेची, तर बीकेसीवर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होईल. या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं दोन्ही गटाचे समर्थक राज्यभरातून मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झालीय. या दोन्ही दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. संभाव्य राजकीय संघर्ष पाहता मुंबईत चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.