Shiv Sena : शिवसेनेला आणखी एक धक्का, माजी आमदार अशोक पाटील यांचं शिंदे गटाला समर्थन; उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवल्याचा आरोप
Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या मंडळींनी मला तीन वर्ष त्यांच्यापासून दूर ठेवले. मी उद्धव ठाकरे यांना काही तरी सांगले या भीतीमुळे त्यांनी मला उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुंबई: शिवसेनेतील (shivsena) पडझड अजूनही सुरूच आहे. आता माजी आमदार अशोक पाटील (ashok patil) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. हे समर्थन देताना त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत माझा अपमान सुरू होता. मला प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येत होते. मी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. पण यापूर्वीही मला उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्यात येत होतं. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काही तरी सांगेल या भीतीने मला दूर ठाकरेंजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे मी नाईलाजाने शिंदे गटाला समर्थन देत आहे. मी घेतलेला हा ठाम निर्णय आहे. आता मागे पुढे राहायचं नाही, असं अशोक पाटील यांनी शिंदे गटाला समर्थन देताना म्हटलं आहे.
गेले कित्येक वर्ष मी शिवसेनेचे काम करत होतो. त्यामुळे मी आमदार झालो. मात्र माझा अपमान करणे कार्यक्रमांना न बोलवणे आदी प्रकार सुरू होते. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला फिरणारी मंडळी या कुरापती करत होत्या. मला आपणास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे मी पक्षात अस्वस्थ होतो. याबाबत मी अनेक वेळा पक्षश्रेष्ठीशी बोललो होतो. पण त्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंत अशोक पाटील यांनी व्यक्त केली.
कोळी बांधवही नाराज
कोळी बांधवांचे अनेक प्रश्न मी दिल्लीपर्यंत घेऊन गेलो. त्या कोळी बांधवांसाठीही शिवसेनेने काही केले नाही. आता कोळी बांधव देखील नाराज आहेत. त्यामुळे कुठेतरी आता हिंदुत्वाची लाट सुरू झालेली आहे आणि याच भावनेतून कोळी बांधवांना न्याय मिळेल यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी आलो आणि मला न्याय मिळेल, असे वचन दिले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
विनायक राऊतांनी वावड्या उठवल्या
उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या मंडळींनी मला तीन वर्ष त्यांच्यापासून दूर ठेवले. मी उद्धव ठाकरे यांना काही तरी सांगले या भीतीमुळे त्यांनी मला उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. विनायक राऊत यांनी देखील विक्रोळीमध्ये बैठक लावून माझ्या बाबत गैरसमज पसरवण्यचां काम केलं. मला काही तरी मिळेल म्हणून मी शिंदे गटात जात असल्याच्या वावड्या विनायक राऊत यांनी उडवल्या. तसेच माझ्या लोकांनाही धमकावण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला.
ती वेळ निघून गेलीय
विनायक राऊत यांनी त्या सभेत मला हिणवण्याचं काम केले आहे. मी गप्प होतो असे देखील उद्धव ठाकरे यांना मी सांगितले. आता मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आता ती वेळ निघून गेलेली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
गद्दार कोण हे भांडूपकरांना माहीत
मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आताचे जे नगरसेवक झालेले ते माझ्यामुळेच झालेले आहेत. खोक्यांवरून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. पण हा प्रयत्न त्यांनाच लखलाभ असो. सच्चा कोण आणि गद्दार कोण हे भांडूपची जनता चांगली ओळखते, असा टोलाही त्यांनी लगावला.