Aditya Thackeray : शिवसेनेला कार्यकर्ते मिळेनात; आदित्य ठाकरेंवर बळजबरीने सभा भरवण्याची वेळ, शिंदे गटाचा टोला
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अलिबागच्या (Alibaug) दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसून येत आहे.

रायगड : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अलिबागच्या (Alibaug) दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांना जबरदस्तीने सभा भरवावी लागत असल्याचा टोला शिंदे गटाचे रायगड उत्तर जिल्ह्याध्यक्ष राजा कोणी (Raja Kuni) यांनी लगावला आहे. कोणी यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी सभा जबरदस्ती भरवली आहे. त्यांच्यांवर या मेळाव्याला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते बोलावण्याची वेळ आली आहे. त्यांना सभेसाठी शोधून मणसं सापडत नाहीत. त्यांच्याच गटातील लोक आम्हाला हा सर्व प्रकार सांगत असल्याचे कोणी यांनी म्हटलं आहे. तसेच सभेमधून आमच्यावर किंवा आमच्या नेत्यांवर कोणी जहरी टीका केली तर ते आम्ही खपवून घेणार नाहीत. आम्ही अरेला, कारे उत्तर देऊ असा इशारा देखील कोणी यांनी दिला आहे.
…म्हणून आम्ही उठाव केला
पुढे बोलताना कोणी यांनी म्हटलं आहे की, रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत असताना महाविकास आघाडीची सत्ता असताना जेव्हा आदित्य ठाकरे हे श्रीवर्धन दौऱ्यावर होते तेव्हा ते तटकरेंच्या घरी जेवायला गेले होते, तेव्हा आम्हा शिवसैनिकांना खूप राग आला होता. कारण आम्ही तटकरेंच्या विरोधात होतो आणि तेव्हा आमचा नेता हा त्यांच्या घरी जाऊन जेवत होता त्यामुळे आम्ही हा उठाव केल्याचं कोणी यांनी म्हटलं आहे. आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यांच्या पालकमंत्रीपदाला आमचा विरोध होता. जिल्ह्याचा पालकमंत्री बदला ही मागणी घेऊन आम्ही मातोश्रीवर गेलो होतो. मात्र तिथे कोणीही आमचे एकलं नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
दरम्यान दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या गद्दारांचं सरकार आहे. सरकारमध्ये निष्ठावंताना किमंत नाही. सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना आता कळालं असेल खरा मुख्यमंत्री कोण आहे ते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सोबतच शिवसेना लवकरच कमबॅक करेल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.