पेडणेकर म्हणतात धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय अपेक्षितच होता कारण…
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टोल लगावला आहे. पेडणेकरांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.
मुंबई: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) शिंदे गट आणि भाजपाला (BJP) जोरदार टोल लगावला आहे. पेडणेकरांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. शिवसेना (Shiv sena) आमची आहे, असं सांगणाऱ्यांनीच आईला बाजारात विकल्याचं त्यांनी म्हटलं. खर तर हे सर्व दसरा मेळाव्यापासून सुरू झालं. शिवसेनेने दसरा मेळाव्यात आपली ताकत दाखवून दिली. त्यानंतर निर्णय घेण्याची झालेली घाई सर्व जनतेने पाहिली. शिवसेना पक्ष नव्हे तर एक कुटुंब आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही खचणार नाही, घाबरणार नाही असं पेडणेकरांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी भाजपावर देखील निशाणा साधला आहे.
‘निर्णय अपेक्षीतच होता’
धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं हा तसा अनपेक्षित निर्णय नव्हता. असं काही तरी होणार हे आम्हाला अपेक्षित होतं. कारण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे यांना फुटून गेलेल्या लोकांकडून आणि विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न झाला त्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. ज्या पद्धतीने हे वाचाळवीर बोलत होते, त्यावरून त्यांच्याकडून कोणीतरी ते बोलून घेत आहे असं वाटत होतं, असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
भाजपावर निशाणा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी म्हटलं होतं आम्ही शिवसेना संपवणारच. ते नाव गोठवू शकतात, चिन्ह गोठवू शकतात पण उद्धव ठाकरे यांना मात्र ते कधीही संपवू शकत नाहीत. आज तुम्ही कुठेही जा, तिथे तुम्हाला लोकांच्या मनात एक प्रकारची चीड दिसून येईल असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे आज मातोश्रीवर ठाकरे गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्येच पक्षाची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे.