मिरा भाईंदर – एकीकडे केंद्रीय यंत्रणेच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे मीरा भाईंदरच्या (Mira Bynder) शिवसेनेच्या आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात माझी व माझ्या कुटुंबियांच्या व्यवसायाची केंद्रीय तपास यंत्रणा मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे पत्र दिल्याने राजकीय नेत्यांना आश्चर्य वाटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत दोषी आढळले तर मी राजकारण सोडेन. तसेच माझ्यासह कुटुंबियांची बदनामी करणाऱ्यांनी माझ्या चांगल्या कामावरती सुध्दा टिप्पणी करावी असा टोला गीता जैन यांनी चर्चा करणाऱ्यांना लगावला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती काही महिन्यांपासून अचानकपणे धाडी पडत आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांच्या मनात भीती आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीतून रोज नवे खुलासे होत आहेत. तसेच संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात रोज आरोपप्रत्यारोप होत आहेत. पण शिवसेना आमदार गीता जैन यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. काही लोक त्यांच्या व्यवसायावरून त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून केंद्रीय यंत्रणा मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
“मी बांधकाम व्यावसायिक आहे, तो व्यवसाय किती किचकट आहे हे देखील मला माहित आहे. तरी सुद्धा मी चौकशीचं आवाहन केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत दोषी आढळले, तर मी राजकारण सोडेन” असं गीता जैन यांनी म्हटलं आहे. माझ्यासह कुटुंबियांना बदनाम करणाऱ्या लोकांना माझी चांगली काम दिसत नाही.
आम्ही राजकारण हे समाजसेवेसाठी करत असून माझे राजकारण हे संपूर्ण जनतेला समर्पित आहे.