औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला सवाल!
औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे.
मुंबई: औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय. अशावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे. (Arvind Sawant’s question to Congress)
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होईल”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
चंद्रकांत खैरेंचा इशारा
त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच दिला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्यासाठी केंद्राची कार्यवाही
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. त्यावर “गेल्या 6 वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना पत्र लिहून त्यात राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं. केंद्राकडून प्राथमिक मान्यता मिळायला हवी होती. ती मिळाली नसल्याचं त्यांना पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यावर मंगळवारी राज्यमंत्र्यांनी पत्र पाठवून प्रक्रिया सुरु असल्याचं म्हटलं आहे. आता आपण वाट पाहत आहोत. फेब्रुवारीत जयंतीपूर्वी मंजुरी मिळावी”, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या:
नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु : संजय राऊत
Arvind Sawant’s question to Congress