मुंबई: पौराणिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. विदर्भातील राजकारणात रामटेक मतदारसंघ कायमच महत्त्वाचा ठरला आहे. सुरुवातीला काँग्रेसचे वर्चस्व असणारा हा मतदारसंघ अलीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. विदर्भात शिवसेनेची फारशी ताकद नसली तरी रामटेकमध्ये सलग दोनदा विजय मिळवून खासदार कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघावरील आपली मांड पक्की केली आहे.
कृपाल तुमाने यांचा जन्म 1 जून 1965 रोजी नागपुरात झाला. नागपुरात त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या कृपात तुमाने यांनी सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम केले. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी राजकारणात प्रवेश केला. इतक्या वर्षाच्या राजकीय कारकीर्दीनंतरही कृपाल तुमाने आजही तळागाळातील नागरिकांशी संपर्कात आहेत. हाच दांडगा जनसंपर्क कृपाल तुमाने यांची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय, जनमानसात त्यांचा स्वत:चा असा एक वैयक्तिक करिष्माही आहे
कृपाल तुमाने यांना लहानपणापासूनच राजकारणाचे आकर्षण होते. याच आकर्षणातून त्यांनी दहावी पास झाल्यानंतर काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी ते फक्त 16 वर्षांचे होते. मात्र, कृपाल तुमाने यांना काही करुन काँग्रेसमध्ये काम करायचे असल्याने त्यांनी आपण सज्ञान असल्याचे सांगितले. यानंतरच्या काळात कृपाल तुमाने यांनी सेवादल आणि युथ काँग्रेससाठी काम केले. नंतरच्या काळात कृपाल तुमाने यांना काँग्रेसमध्ये फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर शिवसेनेत प्रवेश केला.
2009 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कृपाल तुमाने यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांनी कृपाल तुमाने यांचा अवघ्या 16 हजार मतांनी निसटता पराभव केला. यानंतर कृपाल तुमाने नागपुरातून आपला बोजाबिस्तरा आवरून रामटेकमध्ये स्थायिक झाले. पाच वर्षांच्या काळात कृपाल तुमाने यांनी मतदारसंघातील लग्न, मयत, बारसं अशा प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आपला जनसंपर्क वाढवत नेला.
2014 साली कृपाल तुमाने यांना पुन्हा एकदा रामटेक मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी वासनिक यांच्याविरुद्ध पावणे दोन लाखांचे मताधिक्य मिळवत आपल्या पराभवाचा वचपा काढला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. म्हणूनच एवढा मोठा विजय मिळविणाऱ्या तुमाने यांना शिवसेनेने 2019 मध्येही कृपाल तुमाने यांना उमेदवारी देऊ केली आहे. हा विश्वास सार्थ ठरवत कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय मिळवला.