शिवसेनेचा सामर्थ्यवान नेता, आमदारकी अन् खासदारकीची हॅटट्रिक, कोण आहेत प्रतापराव जाधव?
MP Prataprao Jadhav | प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला.
मुंबई: सलग तिसऱ्या टर्ममध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले होते. त्यामुळे विदर्भातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्रतापराव जाधव यांचा समावेश होतो.
कोण आहेत प्रतापराव जाधव?
प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला.
प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास
प्रतापराव जाधव यांनी अगदी सरपंचपदापासून सुरुवात करत खासदारकीपर्यंतची झेप घेतली आहे. मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला दबदबा वाढवत नेला. त्यामुळे 1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला होता.
त्यामुळे शिवसेनेने 2009 साली त्यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात 28 हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता. 2014 साली देशभरात मोदी लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा विजय सुकर झाला. तर 2019 मध्ये त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला होता. अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे या निवडणुकीत काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर प्रतापराव जाधव यांनी सलग लोकसभेच्या तिसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवला होता.
फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर स्वपक्षीय नेत्याचे कान टोचले
काही महिन्यांपूर्वी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी गायकवाड यांना समज दिली होती. पुढील काळात अशा घटना घडू नये, कोणीही भावनेच्या आहारी जाऊ नये, सर्वांनी शब्द मोजून मापून वापरले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.
आपल्या कुणा जवळच्या व्यक्तीला, कार्यकर्त्याला बेड उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नाही, इंजेक्शन उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्रागा होतो. त्यातून अपशब्दही निघतो, मात्र त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. त्यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत, असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला होता.
संबंधित बातम्या:
बुलडाण्यातील गायकवाड-कुटे वादावर पडदा, सेना खासदार प्रतापराव जाधव यांनी खडेबोल सुनावले
“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”