गाडी सुरु होताना धक्के खाते, एकदा सुटली की सुसाट जाते : संजय राऊत
शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठाकरे सरकारला (Sanjay Raut on Abdul Sattar resign) पहिला धक्का दिला आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठाकरे सरकारला (Sanjay Raut on Abdul Sattar resign) पहिला धक्का दिला आहे. मात्र हा राजीनामा आपल्याकडे आलाच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार संजय राऊत (Sanjay Raut on Abdul Sattar resign) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, “जेव्हा मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा राजभवनात जातो. अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याबाबतचं सत्य मुख्यमंत्री किंवा राजभवन सांगू शकतं.”
शिवसेनेने अब्दुल सत्तारांना राज्यमंत्री देऊन त्यांचा सन्मान केला. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाही. सर्वांना अॅडजस्ट करावं लागतं. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत अब्दुल सत्तारांना मंत्रिपद दिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मी सुद्धा सत्तारांच्या राजीनाम्याची बातमी पाहिली. ते नाराज का आहेत ते मला माहित नाही. त्यांना मंत्री बनवलं आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाहीत. सर्वांना अॅडजस्ट करावं लागतं. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत त्यांना मंत्रिपद दिलं आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.
नाराज मूळचे शिवसैनिक नाहीत
जे नाराज आहेत, ते मूळचे शिवसैनिक नाहीत. बाहेरुन शिवसेनेत आले आहेत. त्यांना शिवसेनेत अडजस्ट होण्यास काहीसा वेळ लागत आहे. त्यापैकी अब्दुल सत्तार असावेत. ते पक्षात आले आहेत, त्यांना शिवसेनेने स्वीकारलं आहे. त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. मरेपर्यंत शिवबंधन सोडणार नाही, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला होता. ते शब्द पाळणारे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
गाडीला सुरुवातीला धक्के
गाडी सुरु होताना सुरुवातीला धक्के बसतात. मात्र हे सुरुवातीचे धक्के असतात. गाडीला धक्का बसतो, पण एकदा सुरु झाली की सुसाट सुटते. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. 5 वर्ष पूर्ण करेल. 5 वर्ष भाजप विरोधात बसेल, असं संजय राऊत म्हणाले.
दीपक सावंत जुने-जाणते शिवसैनिक
दरम्यान, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सुद्धा नाराज असल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्याबाबत राऊत म्हणाले, “दीपक सावंत हे जुने जाणते शिवसैनिक आहेत. अनेक वर्ष आमदार होते. 5 वर्ष आरोग्य मंत्री होते. त्यांच्या नाराजीचे कारण त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या भावना पक्षप्रमुखांकडे पोहोचवेन असं मी सांगितलं. सध्या पक्षप्रमुख मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीत व्यस्त आहेत”.
खातेवाटप का जाहीर होत नाही याबाबत मुख्यमंत्री सांगतील. कोणतंही खातं, छोटं मोठं नसतं, केंद्रात असो वा राज्यात, जनतेची सेवा करायची असते. मंत्रिपदं छोटी-मोठी असं जे समजतात ते देशाचा आणि जनतेचा अपमान करतात, असं म्हणत संजय राऊत यांनी नाराजांना सल्ला दिला.