Vinayak Raut : राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागलीय; विनायक राऊतांची टीका
Vinayak Raut : शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेवाळे यांच्यावर टीका केली. राहुल शेवाळे यांना आता अक्कलदाढ यायला लागली आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेच्या 12 खासदारांनी बंड करून संसदेत सवतासुभा मांडला आहे. आधीच आमदार फुटल्याने कोंडी झालेल्या शिवसेनेची खासदारांच्या बंडामुळे आणखीनच कोंडी झाली. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोरांमध्ये एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर शिवसेना खासदार विनायक राऊत (vinayak raut) आणि शिवसेनेचे (shivsena) बंडखोर खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांच्यात लोकसभेतील गटनेतेपदावरून जोरदार जुंपली आहे. विनायक राऊत यांनी काहीही बोलू द्या. गटनेता मीच आहे. आण्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं होतं. त्यावर विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागली आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राऊत यांच्या आरोपाला शेवाळे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शेवाळे यांच्यावर टीका केली. राहुल शेवाळे यांना आता अक्कलदाढ यायला लागली आहे. थेट नगरसेवकपदावरून त्यांना खासदार बनवले. त्याची जाणीव ठेवावी. आदित्य ठाकरे यांची अवहेलना करू नये. येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळेंना त्यांची जागा दाखवून देऊ, असं विनायक राऊत म्हणाले.
लोकसभा अध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर नाही
लोकसभा अध्यक्षांनी आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली असं आम्ही त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं. संसदेतील पदांच्या बदलाबाबत आज पुन्हा लोकसभा अध्यक्षांना दिले. पत्र दोन पानांचे आहे. आज नवीन पत्र अध्यक्षांकडे सादर केलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. लोकसभा सचिवालयाकडून मोठी चूक झालेली आहे, असा दावाही त्यांनी केला.
केसरकर, देसाईंनी पोपटपंची करू नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा देण्यास मनाई केली होती, असा आरोप शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांनी सांगावं की मला सुरक्षा दिली नव्हती. शिंदे यांना योग्य ती सुरक्षा देण्यात आली होती. यावर शंभुराज देसाई आणि दीपक केसरकर यांनी पोपटपंची करू नये, अशा शब्दात त्यांनी फटकारलं.