भगवा धनुष्यबाण श्रीरामाच्या चरणी, शिवसेनेच्या धनुष्यबाणाची अयोध्येत का चर्चा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांना घेऊन लवकरच अयोध्येत जाणार आहेत. पुढील आठवड्यात शिंदे टीमचा हा अयोध्ये दौरा निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय.
गजानन उमाटे, नागपूरः निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालानंतर शिवसेना पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मिळालं आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेच्या साम्राज्यात भगवा झेंडा आणि धनुष्यबाणाला विशेष महत्त्व आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या शिवसैनिकांसाठी तर भगवा आणि धनुष्यबाण हे अत्यंत भावनिक विषय आहेत. हाच धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हिसकावून घेतल्याची भावना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळाल्याचा आनंद शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकनाथ शिंदे गटाचा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांना थेट अयोध्येतून एक भगवा धनुष्यबाण दिला जाणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या चरणी एक धनुष्यबाण अर्पण केला जातोय तर श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श करून, त्याची पूजा केलेला एक धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते अयोध्येतही पोहोचले आहे.
किरण पांडव यांचे कार्यकर्ते दाखल
नागपूरचे शिंदे गट अर्थात शिवसेनेचे आमदार किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात हितेश यादव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचं एक पथक नुकतंच अयोध्येत दाखल झालं आहे. आज शिवसेना पक्षाचं चिन्ह, भगवा धनुष्यबाण घेऊन हे कार्यकर्ते राम मंदिरात पोहोचले आहेत. या धनुष्यबाणाची तेथील गुरुजींच्या हस्ते विधिवत पूजा होईल. त्यानंतर एका धनुष्यबाणाची खास पूजा केली जाईल, तो घेऊन विदर्भातील हे कार्यकर्ते लवकरच महाराष्ट्रात परततील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा धनुष्यबाण त्यांना भेट म्हणून दिला जाईल.
या भगव्या धनुष्याची चर्चा वेगळीच…
महाराष्ट्रातील कार्यकर्ते अयोध्येत शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन गेल्यामुळे नवीच चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी अयोध्येत नवस बोलला होता, अशी चर्चा सुरु आहे. तोच नवस फेडण्यासाठी हे कार्यकर्ते अयोध्येत भगवा शिवधनुष्य प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आले आहेत, असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातातील धनुष्यबाण पाहून अयोध्येत चर्चा रंगली आहे. तर महाराष्ट्रातही राजकीय वर्तुळात याविषयी बोललं जातंय.
मुख्यमंत्री लवकरच अयोध्येत…
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांना घेऊन लवकरच अयोध्येत जाणार असल्याचं म्हटलं जातंय. पुढील आठवड्यात शिंदे टीमचा हा अयोध्ये दौरा निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय. अयोध्येत पूजलेला एक शिवसेनेचा भगवा धनुष्यबाणी मुख्यमंत्री तेथून महाराष्ट्रात आणतील. हा धनुष्यबाण राज्यभर फिरवला जाईल, असं सांगण्यात येत आहे. श्रीरामाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील जनतेशी या धनुष्यबाणाद्वारे वेगळं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल.