सोमय्यांना तिकीट नकोच, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
मुंबई : एकीकडे राज्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकत्र आलेले असताना मुंबईत मात्र, यापेक्षा वेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक झाली. यात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. किरीट सोमय्या […]
मुंबई : एकीकडे राज्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकत्र आलेले असताना मुंबईत मात्र, यापेक्षा वेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक झाली. यात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील तिढा आता आणखी चिघळत चालल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसैनिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोमय्यांची तक्रार केली. विशेष म्हणजे भाजपनेही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये ईशान्य मुंबईत कुणाला तिकीट द्यायचे याबाबत खलबते सुरू आहेत. त्यात शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आता मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘मुंबई महानगरपालिका ‘माफिया राज’ चालवते’
दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाच लक्ष केले होते. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमय्यांनी मुंबई महापालिकेत पाण्याची विक्री, रस्ते, डंपिंग ग्राऊंड, नालेसफाई यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. तसेच पालिका ‘माफिया राज’ चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.
‘मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच होणार’
भाजपने भांडुपमधील एका जागेवरील पालिकेच्या पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता. या वियजानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. मात्र, शिवसेनेने मनसेचे पालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यासह 6 नगरसेवकांना मनसेतून शिवसेनेत घेण्यात यश मिळवले आणि भाजपचे महापौर पद मिळवण्याचे मनसुबे उधळून लावले.
या घटनांमध्ये दुखावल्यानेच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे सोमय्या सोडून इतर कुणालाही उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच इतर कोणत्याही उमेदवारीसाठी आपण काम करू, अशी भावना व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. अशात या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास सोमय्यांना शिवसैनिकांची मदत मिळणे सद्यस्थितीत तरी कठीण दिसत आहे.