Uddhav Thackeray : शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका; बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात धाव
एकनाथ शिंदे गटाविरोधात पुन्हा एकदा शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी , सरकार स्थापनेचे निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक या सगळ्या विरोधात शिवसेनेने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली: एकनाथ शिंदे (Eknath Sinde) गटाविरोधात पुन्हा एकदा शिवसेनेने (shiv sena) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. बहुमत चाचणी , सरकार स्थापनेचे निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक या सगळ्या विरोधात शिवसेनेने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आता सुप्रिम कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी दोन्हीकडून देखील आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बंडखोरांनी पक्षाने काढलेल्या व्हीपच्याविरोधात मतदान केल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रारीचे पत्र देण्यात आले होते. तर बंडखोरांकडून शिवसेनेत सध्या असलेल्या 16 आमदारांनी व्हीपच्या विरोधात मतदान केल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. बहुमत चाचणीच्या वेळी देखील हेच पहायला मिळाले आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
आधीच्या याचिकेवरील निकाल प्रलंबित
दरम्यान ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी याचिका शिवसेनेने याआधीच न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील निकाल अद्याप प्रलंबित आहे. हा निर्णय प्रलंबित असतानाच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभेत झालेली सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तसेच राज्यपालांनी दिलेले सरकार स्थापनेचे निमंत्रण या सर्वांविरोधात आता शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’
दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून आता शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नव्या चिन्हाच्या तयारीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तसे आवाहन देखील करण्यात आले आहे. नव्या पक्षचिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वेळ अजून गेलेली नाही, त्यांनी भाजपाच्या वरिष्ठांशी बोलावे, यातून सुवर्णमध्य निघेल अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजप गेल्या अनेक वर्षांपासून मित्र असल्याचे देखील केसरकर यांनी म्हटले आहे.