Shivsena | शिवाजीराव आढळराव पाटील मोठ्या निर्णयाच्या तयारीत? उद्या महत्त्वाची बैठक, कार्यकर्त्यांना आमंत्रण!
शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
पुणेः पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे (Sharad sonawane) यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेतील आमदारांची (Shivsena MLA) मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांचाही गट शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्याकडूनही मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने याआधी शिवाजीराव पाटील यांच्याविरोधात पक्षविरोधी कृती केल्याने कारवाई करण्यात आल्याची बातमी पसरली होती. मात्र अनावधानाने ही माहिती पसरल्याचे शिवसेनेच्या वतीनेच जाहीर करण्यात आले होते.
शिवाजीराव पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र
शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार दि.19 जुलै रोजी स. 10 वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका-आंबेगाव येथे माझ्या व शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे मा. आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. कृपया शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व तमाम शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, ही विनंती, असे आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे.
शिवाजीराव पाटलांची अस्वस्थता विकोपाला…
गेल्या 15 वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजय मिळवला आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत पाटील यांना राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. शिवसेनेकडून शिरूरऐवजी पाटील यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीची ऑफर देण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडीमुळे काँग्रेस पुण्याची जागा शिवसेनेसाठी सोडेल का, हा प्रश्न आहे. त्यातच आढळराव पाटील यांच्यावर उपनेते पदावरून पक्षातून हकालपट्टी करण्याचे वृत्त पसरले, त्यानंतर त्यांना शिवसेनेतर्फे ही ऑफर देण्यात आली होती. आता उद्याच्या बैठकीत आढळराव पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.