‘मातोश्री’वर जिल्हानिहाय बैठका, शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरु?
मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना, विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election ) दोन्ही पक्षाकडून स्वबळाचीही चाचपणी सुरु आहे.
मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना, विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election ) दोन्ही पक्षाकडून स्वबळाचीही चाचपणी सुरु आहे. भाजपच्या (BJP) महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी सर्व 288 जागा लढण्याबाबतचं वक्तव्य केल्यानंतर, आता शिवसेनाही (Shiv Sena) स्वबळाची चाचपणी करत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर बैठकांचं सत्र सुरु आहे. उद्धव ठाकरे जिल्हानिहाय राजकीय समीकरणं जाणून घेत आहेत. काल रायगडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर आज पालघरमधील पदाधिकऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आलं. यावेळी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय होऊ शकता.
दुसरीकडे पालघरमध्ये शिवसेनेकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढलेले श्रीनिवास वनगा यांना विधानसभेऐवजी विधानपरिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पालघरमधील सध्याची विधानसभानिहाय राजकीय स्थिती.
- वसई : हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी
- नालासोपारा : क्षितीज ठाकूर, बहुजन विकास आघाडी
- बोईसर : विलास तरे, बहुजन विकास आघाडी
- पालघर : अमित घोडा, शिवसेना
- डहाणू : पास्कल धनारे, भाजप
- विक्रमगड : विष्णू सावरा, भाजप
मुख्यमंत्री भाजपचाच : सरोज पांडे
भाजपचा मुख्यमंत्री होईल असा संकल्प करा, महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बनवू, असं विधान भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं. सरोज पांडे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही तशाच प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं की काय असं चित्र आहे.
सेना-भाजप फॉर्म्युला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती करण्यामागचा एक फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पण लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेलं यश आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने शिवसेनेवर आपलं दबावतंत्र पुन्हा सुरु केलं आहे. भाजप नेत्यांच्या दररोज होत असलेल्या विधानांनी शिवसेनेच्या उरात धडकी भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता सेनेने जिल्हानिहाय बैठका घेत, विधानसभेची स्वबळाची तर तयारी सुरु केली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
मी सर्वांचा मुख्यमंत्री : फडणवीस
“मी कोणत्याही एका पक्षाचा मुख्यमंत्री नाही. मी भाजपसह शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचाही मुख्यमंत्रीही आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadanvis) गोरेगावच्या विशेष कार्यसमिती बैठकीत केले होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी गोरेगावमध्ये भाजपची विशेष कार्यसमिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री कोणाचा या वादात पडू नये, भविष्यातील मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
संबंधित बातम्या
मी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस